होमपेज › Belgaon › सीमाभागात पाच जणांचा शोध

सीमाभागात पाच जणांचा शोध

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:25PMबंगळूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमांवरील आणखी पाच जणांचा गौरी हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय विशेष तपास पथकाला (एसआयटी) आहे. त्यानुसार बेळगावातील तिघांसह आणखी दोघांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, हत्येच्या दिवशी सुधन्वा गोंधळेकर बंगळुरात असल्याबाबत सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले असून पुणे येथील न्यायालयात पुरावे सादर केले जाणार आहेत.

संशयित काही संघटनांशी संबंधित आहेत. यापैकी एका संघटनेला त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग हत्यांमध्ये असल्याचे माहीत होते, असा संशय एसआयटीला आहे. संशयितांना अटक झाल्यानंतर याबाबत संघटनांनी लगेचच स्पष्टीकरण दिले. आपल्या संघटनेचे ते कार्यकर्ते नसल्याचे सांगितले.

मास्टरमाईंड अमोल काळे याने गौरी हत्येसाठी दुसरा गट तयार केला होता. ती जबाबदारी सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांच्यावर सोपविण्यात आली होती. गौरी यांच्या घराच्या परिसरात दुचाकीवरून आलेली व्यक्‍ती सुधन्वा असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पुणे येथील न्यायालयात याबाबतचे पुरावे सादर केले जाणार असल्याचे एसआयटीने कळविले आहे.

महाराष्ट्राचे तपास पथक खानापुरात?

खानापूर : प्रतिनिधी

गेल्या जानेवारी महिन्यात पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उघडकीस आल्यानंतर तपासाची दिशा आता खानापूर शहराकडे (जि. बेळगाव) वळवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) खानापुरात चौकशी करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

25 जानेवारी रोजी बेळगावातील प्रकाश चित्रपटगृहासमोर सुतळी बॉम्बचा स्फोट केल्याबद्दल खानापूरजवळच्या हलकर्णी येथील संभाजी पाटील या युवकाला अटक करण्यात आली होती.  या स्फोटांसाठी नांदेड येथे बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने खानापूरकडे तपासाची दिशा वळविली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आठ अधिकार्‍यांचे एक पथक संशयित संभाजी पाटीलच्या घरी शुक्रवारी गेले होते. त्या पथकाने संभाजीच्या घरातील काही लोकांकडे विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशात विविध ठिकाणी पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी दंगल माजविण्याचा प्रयत्न झाला. बेळगावातही दंगल माजविण्याचा कट रचण्यात आल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाल्याने पोलिसानी संभाजीला अटक केली. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील तपास यंत्रणांनी खानापूरवर करडी नजर रोखली आहे. स्फोटाचे धागेदोरे थेट नांदेडपर्यंत असल्याचा संशय तपास यंत्रणांना असल्याने तपासाची गती वाढली आहे.

नुकताच कर्नाटक एसआयटी महाराष्ट्रात जाऊन कांही संशयितांचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यादरम्यान, महाराष्ट्र एटीएसने एसआयटीकडून नियोजित दंगलीविषयीची माहिती घेतली.   त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात दंगलीचा कट रचणार्‍यांचा विचारवंतांच्या हत्येशी संबंध असल्याचाही संशय आहे.