Mon, Aug 19, 2019 11:45होमपेज › Belgaon › गौरी हत्येचा कट बेळगावात!

गौरी हत्येचा कट बेळगावात!

Published On: Jun 03 2018 1:30AM | Last Updated: Jun 03 2018 1:27AMबंगळूर / पिंपरीः प्रतिनिधी

‘लंकेश पत्रिका’ या कन्‍नड साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट बेळगाव येथील एका हॉटेलमध्ये शिजला असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे येथील एका युवकाने व विजापूरमधील त्याच्या 29 वर्षांच्या सहकार्‍याने गौरी यांची हत्या होण्यापूर्वी तीन महिन्यांपर्यंत त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. बंगळूर न्यायालयामध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या रिमांड अर्जानुसार ही माहिती  उपलब्ध झाली आहे. 

पुणे येथील अमोल काळे व विजापूर येथील मनोहर दुंडाप्पा यादवे हे दोघेही ‘एसआयटी’ पथकाच्या कोठडीमध्ये आहेत. काळे व त्याचा सहकारी दादा ऊर्फ निहाल हे मनोहर यादवेला जून 2017 मध्ये बेळगावमधील एका हॉटेलमध्ये भेटले होते. त्यांनी गौरीच्या हत्येचा आदेश बजाविला होता. दादा अद्याप फरारी आहे. त्याप्रमाणे ‘एसआयटी’ने न्यायालयामध्ये रिमांड अर्ज दाखल केला आहे. एसआयटीने काळेची डायरी जप्त केली आहे. डायरीमध्ये हत्येसंबंधीची ब्ल्यूप्रिंट सापडलेली आहे. काळेकडे सापडलेल्या एका कागदावर 8 जणांची नावे असल्याची माहिती 

‘एसआयटी’ला मिळालेली आहे. ती नावे काळेने स्वहस्ताक्षरात लिहिलेली आहेत. त्यामध्ये दुसर्‍या क्रमांकावर गौरी यांचे नाव आहे. त्या नावाबद्दल काळेने समाधानकारक उत्तर दिलेले नाही. यादवेच्या डायरीमध्ये गौरी लंकेश यांच्या घराचा स्केच काढलेला सापडला. यादवेने आपली ओळख सापडू नये म्हणून हेल्मेटचा उल्लेखही  ‘कोड वर्ड’ने केला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा उल्लेख ‘बल्ब ’ असा केलेला आहे. जून 2017 मध्ये बेळगावमधील हॉटेलमध्ये बैठक झाल्याचा सविस्तर तपशीलही नमूद केलला आहे. 

दरम्यान, गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) 21 मे रोजी चौघांना अटक केली आहे. अटक केलेले हे चार जण सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचेही पोलिस यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. 

गतवर्षी पाच सप्टेंबर रोजी बंगळूरमधील आरआरनगरमध्ये घराबाहेर गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी चार दिवसांपूर्वी के. टी. नवीनकुमार याच्याविरोधात एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्याने गोळ्या झाडणार्‍यांना लंकेश यांच्या घरापर्यंत पोहोचवणे व मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावल्याचे आरोपपत्रात म्हटले आहेे.

त्यानंतर या हत्या प्रकरणात सुजित कुमार, अमोल काळे ऊर्फ भाईसाहेब ऊर्फ संजय भन्सारे (39, रा. माणिक कॉलनी, चिंचवडगाव,  पुणे), अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीप महाजन (28, रा. कळणे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. फोंडा, गोवा), मनोहर येडावे ऊर्फ मनोज (28) या चार संशयितांना गुरुवारी (दि. 31) एसआयटीने ताब्यात घेतले. त्यामुळे लंकेश हत्या प्रकरणाचे पिंपरी-चिंचवड ‘कनेक्शन’ समोर येत आहे. अटक केलेल्या चार संशयितांपैकी अमोल हा चिंचवडमधील सनातनचा सक्रिय साधक आहे.

पोलिस कोठडीतूनच मिळाली महत्त्वाची माहिती

गौरी लंकेश यांच्या हत्येची महत्त्वाची माहिती पोलिसांना पोलिस  कोठडीत मिळाल्यानंतर 31 मे रोजी एसआयटीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांना 11 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवले आहे. या चार जणांकडे 43 पेक्षा अधिक मोबाईल सीम मिळाली आहेत. याचबरोबर ते विविध प्रकारच्या संशयास्पद हालचालींमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.