Mon, May 20, 2019 18:08होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्‍या प्रकरण : ‘ती’ दुचाकीही बेळगावातूनच

गौरी लंकेश हत्‍या प्रकरण : ‘ती’ दुचाकीही बेळगावातूनच

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 11:06PMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली दुचाकी गणेशपूर-ज्योतिनगरच्या सागर सुंदर लाखे याने विकली होती, अशी माहिती विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीतून पुढे आली आहे. त्यामुळे बुधवारी ज्योतीनगर-गणेशपुरातून ताब्यात घेण्यात आलेल्या सागरला गुरुवारी (दि. 30) अटक करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, हत्येनंतर पलायनसाठी वापरण्यात आलेली ओम्नी कारही बेळगावातूनच जप्त करण्यात आली आहे.

आतापर्यंतच्या माहितीवरून गौरी यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या परशुराम वाघमारे याला सागरने आश्रय दिला होता. सागर हा बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचा तो माजी सदस्य असून, सध्या तो फुलांची नर्सरी चालवीत होता. संशयित भरत कुरणे याच्या फार्म हाऊसवर संशयितांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी व्हॅनचालकाची भूमिका त्याने पार पाडली होती. हत्येनंतर कुरणेच्या शेतात झालेल्या पार्टीमध्येही त्याचा सहभाग होता, अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली आहे. 

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकल कैद झाली आहे. दुपारी 3 च्या सुमारास आणि सायंकाळी 7 च्या सुमारास दोघे त्या मोटारसायकलवरून घटनास्थळावर आले होते. ती दुचाकी सागरनेच विकली होती, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. 

महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) काही दिवसांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणात काही संशयितांना अटक केली. गेल्या आठवड्यात कर्नाटक एसआयटीने त्यांची चौकशी केली. संशयितांपैकी दोघे जण गौरी हत्येच्या दिवशी बंगळुरात होते, असा संशय एसआयटीला आहे. 

हत्येसाठी दोन गट

गौरी यांची हत्या 4 सप्टेंबरला करण्यात येणार होती. त्या दररोज घरी येण्याच्या वेळेस मारेकरी त्यांच्या घराजवळ हजर होते. पण, त्या दिवशी वेळेआधीच त्या आल्या आणि घराचा दरवाजा उघडून गेल्या. त्यामुळे संशयित वाघमारे आणि गणेश मिस्कीन माघारी परतले. या हत्येचा मास्टरमाईंड समजला जाणारा अमोल काळे याने आणखी एक पथक तयार केले होते. अपयश आले तर सुधन्व गोंधळेकर आणि शरद कळसकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात येणार होती. दुसर्‍याच दिवशी पुन्हा हत्येचा कट यशस्वी करायचाच या हेतून दुसरे पथकही तयार ठेवण्यात आली. वाघमारे आणि मिस्कीन अशयस्वी झाले तर दुसर्‍या पथकाकडून हत्या करण्यात येणार होती. गौरी यांच्या घरानजीक असणार्‍या उद्यानाकडे थांबावयाची सूचना  दुसर्‍या पथकाला देण्यात आली होती. हत्या झाल्याची खात्री केल्यानंतर दुसरे पथक तेथून निघून गेले.

कलबुर्गींचा मारेकरी हुबळीचा 

अमोल काळे, अमित दिगवेकर, राजेश डी. बंगेरा, गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांचा विचारवंत साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत सहभाग असल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. मात्र, यामध्ये कलबुर्गी यांच्या मारेकर्‍याचा समावेश नाही. मारेकर्‍याला मोटारसायकलवरून घेऊन जाणारा संशयितही अटकेत नाही. काळेच्या डायरीत सापडलेल्या सुगाव्याच्या आधारावर काही संशयितांचा तपशील सीआयडीला मिळाला आहे. ती सर्व नावे कोडवर्डमध्ये आहेत. कलबुर्गी यांचा मारेकरी हुबळीचा असल्याचा अंदाज एसआयटी अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला आहे.