Wed, Jul 17, 2019 20:07होमपेज › Belgaon › गणेशपूरचा युवक ताब्यात 

गणेशपूरचा युवक ताब्यात 

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 30 2018 12:00AMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने बेळगावजवळील गणेशपूर येथील सागर नामक युवकाला ताब्यात घेतले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. गौरी यांच्या हत्येनंतर पलायनासाठी वापरण्यात आलेली ओमनी सागरची असल्याचा संशय एसआयटीला आहे.

नुकताच एसआयटीने बेळगावातून ओमनी कार जप्‍त केली होती. ही ओमनी गौरी यांच्या हत्येनंतर मारेकर्‍यांनी पळून जाण्यासाठी वापरली होती.त्याबद्दल आता सागरला ताब्यात घेण्यात आले आहे. ती ओमनी कार त्याचीच असल्याचे निष्पन्‍न झाल्यास त्याच्यावरही अटकेची कारवाई होईल.  

गौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीने 8 ऑगस्ट रोजी संभाजी गल्ली, महाद्वार रोड परिसरातून संशयित भरत कुरणेला अटक केली होती. त्यानंतर त्याला घेऊन 19 ऑगस्ट रोजी एसआयटीचे एक पथक बेळगावात दाखल झाले होते. खानापूर तालुक्यातील चिखले परिसरासह बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी तपास चालविला होता. या तपासादरम्यान बेळगाव येथून ओमनी कार जप्‍त करण्यात आल्याचे एसआयटी पोलिसांनी सांगितले होते. 

सदर जप्‍त करण्यात आलेल्या कारचा मालक बेळगावजवळच्या गणेशपूर भागातील सागर नामक तरुण असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसआयटीने त्याला ताब्यात घेतले आहे. हा युवक राजकारणाशीही संबंधित असून, तो हिंदुत्ववादी संघटनेशीही संबंधित असल्याची माहिती एसआयटी सूत्रांनी दिली. भरत कुरणेला अटक करण्यात आल्यानंतर 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान पोलिसांनी शहरात तपास केला होता. यामधून सदर प्रकरण समोर आले आहे.  या प्रकरणाशी संबंधित बेळगावमधून आता दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एसआयटीला बेळगाव परिसरातून एकूण तिघेजण वाँटेड असून, त्यापैकी कुरणेला अटक झाली. तर सागरला ताब्यात घेण्यात आले आहे. तोही संशयितांपैकीच एक असण्याची शक्यता आहे. तिसर्‍या संशयिताचा मागमूस मात्र अजून लागलेला नाही. तिन्ही संशयितांची रेखाचित्रे एसआयटीकडे तयार आहेत. त्याआधारेही तपास सुरू आहे.

बॉडी वॉरंटसाठी सीबीआय न्यायालयात
बंगळूर : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्ये प्रकरणी महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेले संशयित गौरी लंकेश हत्येतील संशयितांच्या संपर्कात होते, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे दाभोलकर हत्येचा तपास करणार्‍या सीबीआयने गौरी हत्येतील तिघा संशयितांना ताब्यात घेण्यासाठी बंगळूर जिल्हा सत्र आणि मुख्य न्यायालयाकडे बॉडी वॉरंटसाठी अर्ज केला आहे.

महाराष्ट्रात अटक करण्यात आलेले संशयित वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर यांच्या सीबीआय चौकशीवेळी ते गौरी हत्येतील संशयितांशी थेट संपर्कात असल्याचे उघडकीस आले. गौरी हत्येनंतर शिमोग्यातील सुजितकुमार पुणे येथे पळून गेला होता. त्याला सुधन्वाने आपल्या मित्राच्या घरी आसरा दिला होता. गौरी हत्येतील मास्टरमाईंड समजला जाणारा अमोल काळे दाभोलकर हत्येतील मुख्य संशयित असल्याचे समजते. कोडगूतील राजेश डी. बंगेरा याने संशयितांना पिस्तूल प्रशिक्षण दिले आणि अमित दिगवेकरने आर्थिक मदत केल्याचे कर्नाटक एसआयटीच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यामुळे सीबीआयने पुणे न्यायालयात युक्‍तिवाद करताना या दोन्ही हत्येत साम्य असून मारेकरीही एकाच संघटनेतील असल्याचे सांगितले.

सध्या हे तिन्ही संशयित कर्नाटक एसआयटीच्या अटकेत असून त्यांना ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. मडगाव स्फोट प्रकरणातील संशयित रूद्र पाटील, सारंग अकोलकर, विनय पवार, विरेंद्र तावडे तसेच आणखी काहीजणांना पिस्तूल प्रशिक्षण दिल्याचे बंगेराने एसआयटी चौकशीवेळी मान्य केले आहे. दाभोलकर हत्येतील संशयित सचिन अंदुरेलाही त्यानेच प्रशिक्षण दिल्याचे समजते.

असा सापडला गोंधळेकर

मास्टरमाईंड काळेच्या डायरीतून अनेक माहिती उघड झाली आहे. ती सर्व कोडवर्डमध्ये असून त्याचे डिकोडिंग केले जात आहे. डायरीमध्ये पांडे असे लिहिले होते. त्यापुढे कोडवर्डमध्ये मोबाईल क्रमांक लिहिण्यात आला होता. डिकोडिंग केल्यानंतर तो क्रमांक सुधन्व गोंधळेकरचा असल्याचे उघड झाले. या क्रमांकावर आलेल्या कॉल्सची तपासणी केल्यानंतर काळे आणि गोंधळेकर एकमेकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. कर्नाटक एसआयटीने याबाबतची माहिती दिल्यानंतर महाराष्ट्रातील एटीएसने गोंधळेकरला अटक केली.