Fri, Jul 19, 2019 05:17होमपेज › Belgaon › संशयितांचे बेळगावात वीस दिवस वास्तव्य

संशयितांचे बेळगावात वीस दिवस वास्तव्य

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:53PMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी संशयितांचे बेळगावात 20 दिवस वास्तव्य होते. आणखी एक नव्हे तर तिघे संशयित आहेत. सदर संशयित कपिलेश्‍वर परिसरातील असून, संशयितांची रेखाचित्रेही तयार करण्यात आली आहेत.

ही माहिती तपासातून पुढे आली आहे. मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याची एसआयटीकडून बेळगाव परिसरात आणून चौकशी केल्यानंतर बेळगावचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. एसआयटी अधिकार्‍यांनी बेळगाव परिसरात गुप्तपणे तपास जारी ठेवला आहे. संशयितांचे कपिलेश्‍वर परिसरात 20 दिवस वास्तव्य होते, हे तपासातून पुढे आले आहे. या काळात संशयितांना दैनंदिन आवश्यक वस्तूंचा पुरवठा स्थानिक पातळीवरील एका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मात्र,  संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही संशयितांबाबत कोणतीच माहिती नाही. केवळ आलेल्या सूचनेनुसार पुरवठा त्या त्या वेळेत करण्यात आला. सदर वस्तूंची देवाण घेवाण एकमेकांना न पाहताच करण्यात आली. संबंधित ठिकाणाची माहिती देऊन केवळ त्या वस्तू तेथेठेवून जा, अशा इशार्‍यावर संशयितांना वस्तूंचा पुरवठा करण्यात आल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कपिलेश्‍वर परिसरात वास्तव्यास असणार्‍या तिघा संशयितांचा तपास सुरू आहे. संंबंधितांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. संशयित याच भागातील असल्याचे समजते. 

या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारेची बेळगाव येथील जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर खानापूर परिसरात नेऊन चौकशी करण्यात आली. यामुळे बेळगाव चर्चेचा विषय ठरले आहे. खानापूर परिसरात बंदूक प्रशिक्षण घेण्यात आल्याने एसआयटीने हा भागही पालथा घातला. 

बेळगावात दिले दहा हजार

गौरी लंकेश यांची हत्या केल्यानंतर परशुरामला बेळगावात 10 हजार रुपये देण्यात आले होते, अशी माहिती विशेष पोलिस पथकाने (एसआयटी) दिली आहे. हत्येचा कट आखल्यानंतर परशुरामला बंगळूरला पाठविण्यात आले. त्यावेळी तिघा अज्ञातांनी त्याला तीन हजार रुपये दिले होते. बसभाडे आणि जेवणासाठी ते पैसे उपयोगी पडतील, असे त्याला सांगण्यात आले. हत्या झाल्यानंतर तो आपल्या गावी सिंदगी येथे परतला. दहा दिवसानंतर अमोल काळे याने परशुरामला बेळगावात बोलावले. तेथे दहा हजार रुपये त्याच्या हातात ठेवले. परशुरामला पैशांची गरज होती. मात्र, पैशासाठी हत्या केली नसल्याचे त्याने अमोलला सांगितले. पण, अमोलने त्याला गरजेवेळी पैसे लागतील म्हणून देत असल्याचे सांगितले. कुटुंबीयांची सर्व व्यवस्था पाहिली जाईल. आवश्यक मदत दिली जाईल, असे आश्‍वासन देणारे हत्येनंतर त्याच्या कधीच संपर्कात आले नाहीत, अशी माहिती एसआयटीच्या चौकशी उघड झाली.