Wed, Jan 23, 2019 00:38होमपेज › Belgaon › बेळगावातही एका संशयिताचा शोध

बेळगावातही एका संशयिताचा शोध

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:41AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित अमोल काळे याच्या डायरीतून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एका संशयिताचा शोध बेळगावात सुरू आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या चौकशीत याबाबत माहिती मिळाल्यानंतर एक पथक बेळगावात दाखल झाले होते. तर दुसरे पथक तुमकूरला पाठवण्यात आले होते.

एसआयटीच्या पथकाने बेळगावातील विविध ठिकाणी संशयिताचा शोध घेतला. मात्र, डायरीतील माहितीनुसार संशयित सापडला नाही. या संशयिताने कपिलेश्‍वर परिसरात वास्तव्य केले होते, अशी माहिती एसआयटीला मिळाली आहे. त्यानुसार या परिसरातही शोध घेण्यात आला; पण फारशी माहिती हाती लागलेली नाही. त्या संशयिताचे रेखाचित्रही तयार असल्याचे एसआयटी सूत्रांकडून समजते. तुमकूर येथेही त्याचा शोध लागला नाही. तेथील एका गोशाळेतही तपास करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे सांगणार्‍या परशुराम वाघमारे हा सिंदगी परिसरात उत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याचे मित्र त्याला ‘विराट कोहली’ या टोपण नावाने बोलवत होते. उत्कृष्ट क्रिकेट खेळत असल्याने परिसरात त्याला प्रसिद्धी मिळाली होती. श्रीराम सेनेसारख्या संघटनेत तो कार्य करत होता. मात्र, त्याबद्दल मित्रांशी तो कधीच चर्चा करत नव्हता. कायम कोणत्या तरी विचारात तो असायचा. त्याचे विचार इतर मित्रांना लगेच कळत नव्हते. त्याच्या मित्रांना आणि त्यालाही व्यायामाची आवड होती. ते शरीरसौष्ठवाची तयारी करत होते, अशी माहिती वाघमारेने एसआयटी अधिकार्‍यांना दिली.

गौरी हत्येचा कट आखण्यापूर्वी 2017 मध्ये एका समारंभात वाघमारेची हत्येसाठी निवड करण्यात आली. गोवा येथे झालेल्या अशा समारंभात के. टी. नवीनकुमारला हेरले होते. त्याने आणखी एक संशयित सुजितकुमार ऊर्फ प्रवीणशी संपर्क साधला होता. असे समारंभ आयोजित करणार्‍या संघटनेला कोणतेच नाव नाही. मात्र, सर्वांची नावे या संघटनेने एका रजिस्टरमध्ये नोंद केली आहेत. ही संघटना सशस्त्र आंदोलनावर विश्‍वास ठेवत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.