Sun, Jun 16, 2019 13:02
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › संशयितांच्या केसांवरून सापडणार पुरावे

संशयितांच्या केसांवरून सापडणार पुरावे

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 22 2018 12:11AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाला (एसआयटी) आता संशयितांच्या केसांचा आधार घ्यावा लागत आहे. घटना घडण्याआधी संशयित राहिलेल्या ठिकाणाहून एसआयटीला केस सापडले होते. ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठविण्यात आले आहेत. तो अहवाल आल्यानंतर संशयितांचा हत्येतील सहभाग निश्‍चित होणार आहे. गौरी हत्येनंतर परशुरामला काही जणांनी पाहिले होते. पत्रकारितेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यासह आणखी एकाने परशुरामला ओळखल्याचे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले. 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या झाल्यानंतर परशुराम मोटारसायकलवर मागील बाजूला बसला होता. त्यावेळी विद्यार्थ्यासह तिघा कुली कामगारांनी त्याला पाहिले होते. परशुरामसमोर त्यांना उभे केल्यानंतर दोघांनी त्याला ओळखले. त्याचा चेहरा त्यावेळी स्पष्टपणे पाहिल्याचा दावा त्यांनी केला.

महाराष्ट्रातील अमोल काळे हाच या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय एसआयटीला आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे. त्याचे तीन साथीदार बंगळुरातील एकाच ठिकाणी राहिले होते. तेथे मिळालेल्या केसांची चाचणी घेतली जात आहे. यानंतर अमोलची डीएनए चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीत ‘ते’ केस त्याचेच असल्याचे दिसून आल्यास गौरी हत्येतील त्याचा सहभाग असल्याचा वैद्यकीय पुरावा मिळणार आहे. 

हत्येपूर्वी बंगळुरातील मागडी रोडवरील कडबगेरेनजीकच्या साई लेआऊटमधील क्र. 94 च्या घरात तीन साथीदारांसबोबत अमोल  राहिला होता. त्याला अटक झाल्यानंतर त्याने स्वत: राहिलेले ठिकाण दाखविले. 2010 मध्ये चिन्नस्वामी स्टेडियमनजीक बॉम्बस्फोट झाला होता. त्यावेळी अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिद्दिन संघटनेचा संशयित दहशतवादी खतील याच्याविरोधात केसांची चाचणी महत्त्वाची ठरली होती. त्यामुळेच त्याचा स्फोटातील सहभाग निश्‍चित करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता अमोलची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

गौरी हत्येत सहभाग असल्याचा संशय असला तरी नवीनकुमारला केवळ बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांची माहिती त्याच्याकडून घेतली जात आहे.
हत्येच्या ठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजमुळे संशयितांविरोधात भक्‍कम पुरावा मिळाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एसआयटीने सहा जणांना अटक केली आहे. परशुराम वाघमारे (सिंदगी, विजापूर), के. टी. नवीनकुमार (मद्दूर, मंड्या), अमोल काळे ऊर्फ भाईसाब (महाराष्ट्र), मनोहर येडवे (विजापूर), सुजीतकुमार ऊर्फ प्रवीण (शिकारीपूर, शिमोगा), अमित दिग्वेकर ऊर्फ प्रदीप (गोवा) अशी अटकेतील संशयितांंची नावे आहेत. 

एसआयटीने वाघमारेच्या कुटुंबीयांनाही नोटीस जारी केली आहे. परशुरामचा मित्र सुनील असगर यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी केली जात असली तरी त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचे एसआयटीने सांगितलेले नाही. 

देवाचे काम म्हणून...

‘गौरी यांची हत्या म्हणजे देवाचे काम आहे. ईश्‍वराच्या प्रेरणेमुळेच तुला हे काम मिळाले आहे. या कामासाठी शेकडो लोक तयार आहेत. पण कुणीही त्यासाठी योग्य वाटत नाही. केवळ तुझीच निवड याकरिता झाली आहे,’ असे सांगून आपल्याला विश्‍वासात घेण्यात आल्याची माहिती संशयित परशुराम वाघमारेने एसआयटीला दिल्याचे समजते. परशुरामकडून तपासाला संपूर्ण सहकार्य मिळत आहे. त्याला विचारण्यात येणार्‍या सर्वच  प्रश्‍नांची तो उत्तरे देत आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून योग्य सहकार्य मिळत नाही. दहा प्रश्‍न विचारण्यात आले तर केवळ दोनच प्रश्‍नांना त्यांच्याकडून उत्तर मिळते. 

बंगळुरात केवळ दहा दिवस राहिल्याचे परशुराम सांगतो. त्यामुळे संपूर्ण शहराची ओळख नाही. आपण राहिलेले राजराजेश्‍वरीनगरातील ठिकाण, आसपासचे रस्ते, दुकाने तो ओळखतो. एसआयटीच्या अधिकार्‍यांनी त्याला विविध ठिकाणी फिरवून चौकशी केली. सुंकदकट्टे येथील घर, नागरभावीत प्रवीण याला भेटलेले ठिकाण, अमोलसोबत फिरलेली ठिकाणे त्याने अधिकार्‍यांना दाखविली. संशयिताने केलेल्या सहकार्यामुळे सर्व ठिकाणे आणि पुरावे गोळा करण्यात अडचणी आल्या नाहीत. असेच सहकार्य मिळाले तर त्याला मुदतीआधीच न्यायालयासमोर हजर करता येणार असल्याचे एसआयटी अधिकारी म्हणतात.

कलबुर्गी हत्येचे कनेक्शन

साहित्यिक के. एस. भगवान यांच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी परशुरामकडे अधिक माहिती नाही. पण, साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबद्दल त्याच्याकडे काही माहिती असल्याबद्दल चौकशीवेळी दिसून आलेे. याबाबत कर्नाटक सीआयडी पोलिसांशी चर्चा करण्यात आली आहे. आवश्यकतेवेळी परशुरामला ताब्यात घेऊन सीआयडीकडून चौकशी होणार असल्याची शक्यता एसआयटीच्या सूत्रांनी व्यक्‍त केली.

वाघमारे कुटुंबाला मदतीचे आवाहन

दरम्यान, कर्नाटक श्रीराम सेनेने परशुरामच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आवाहन सोशल साईटवरून केले आहे. फेसबुकवर याबाबतचे पोस्ट अपलोड करण्यात आले आहे. ‘परशुरामच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना आर्थिक मदत करा. आपल्या उत्पन्नातील एक भाग, आपल्या अन्नातील एक घास देशभक्‍तीसाठी द्या. धर्मरक्षकांच्या रक्षणासाठी आपलाही वाटा हवा,’ असा संदेश फेसबुकवर फिरत आहे. त्याखाली आर्थिक मदतीकरिता बँक आणि खाते क्रमांक देण्यात आला आहे.

परशुरामला दोघांनी ओळखले

गौरी हत्येनंतर परशुरामला काही जणांनी पाहिले होते. पत्रकारितेतील पदव्युत्तर विद्यार्थ्यासह आणखी एकाने परशुरामला ओळखल्याचे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले. 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या झाल्यानंतर परशुराम मोटारसायकलवर मागील बाजूला बसला होता. त्यावेळी विद्यार्थ्यासह तिघा कुली कामगारांनी त्याला पाहिले होते. परशुरामसमोर त्यांना उभे केल्यानंतर दोघांनी त्याला ओळखले. त्याचा चेहरा त्यावेळी स्पष्टपणे पाहिल्याचा दावा त्यांनी केला.

दीड कोटी कॉल्स तपासले

तपासावेळी संशयितांचा मागोवा घेण्यासाठी तब्बल दीड कोटी मोबाईल कॉल्स तपासण्यात आले. पण, संशयितांनी मोबाईलपेक्षा कॉईन बॉक्सवरून संपर्क साधल्याचे दिसून आले. यावरून त्यांचे राहण्याचे ठिकाण, कुणाशी संपर्क साधला तसेच इतर माहिती समजल्याचे एसआयटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. 

विजापूर श्रीराम सेनेच्या अध्यक्षांना नोटीस

विजापूर श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष राकेश मठ यांना एसआयटीने नोटीस बजावली आहे. याबाबत मठ यांनीच पत्रकारांना माहिती दिली. एसआयटीने बंगळूरला बोलाविले आहे. पण, गौरी हत्येच्या चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याबद्दलचा उल्‍लेख त्यामध्ये नाही. बंगळूरला जात असून परशुरामचे वडील अशोक आपल्यासोबत असतील, अशी माहिती मठ यांनी दिली.

गौरी यांना महम्मद अली पुरस्कार

गौरी लंकेश यांनी सामाजिक जाणीव आणि जातीय सौहार्दासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय केरळमधील गॅझेटेड अधिकार्‍यांच्या संघाने घेतला आहे. त्यांना मरणोत्तर डॉ. एन. एम. महम्मद अली पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब झाले. 50 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 22 जून रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा तिरूवनंतपूरमधील व्हीजेटी सभागृहात होणार आहे.

अमोल काळेची होणार नार्को 

अमोल आणि अमित दिग्वेकर यांनी प्रकरणाबाबतची महत्त्वाची माहिती लपवून ठेवली आहे. ते तपासाला सहकार्य करण्यास तयार नसल्याने त्यांच्या नार्को चाचणीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. न्यायालयाच्या होकारानंतर चाचणी हेाणार आहे. 

अमोल आणि परशुरामची डीएनए चाचणी घेतली जात असल्याची माहिती एसआयटीने न्यायालयाला दिली आहे. दोघांच्या शरीराच्या काही भागांचे तसेच पायांचे ठसे फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठविले आहेत. या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर  लक्ष वेधले आहे. प्रकरणातील दादा ऊर्फ निहाल नामक मुख्य संशयित अद्यापही सापडलेला नाही. त्याला वाचविण्यात येत असल्याचा संशय एसआयटीला आहे. या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचा सुगावा वाघमारेने दिला आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तिघांचीही रेखाचित्रे तयार करण्यात आली असून न्यायालयात ती सादर करण्यात आली आहेत. वाघमारेने दिलेल्या सर्व माहितीचे छायाचित्रीकरण एसआयटीने केले आहे. डायरीतील कोडवर्डमधील माहिती जाणून घेण्यासाठी त्याचे नमुने हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहेत. संशयितांच्या आवाजाची चाचणीही घेतली जात आहे.  

भगवान यांच्या हत्येचा कट आणि पत्रकार गौरी यांच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्याच्या डायरीत काही प्रसिद्ध लेखक आणि व्यक्‍तींची नावे असल्याने त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. भगवान यांच्यासह अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड, माजी मंत्री बी. टी. ललिता नाईक, सी. एस. द्वारकानाथ, निडुमामिडी मठाचे वीरभद्र चन्नमल्‍ल स्वामी यांची नावे संशयितांच्या डायरीत सापडली. नेहमीच हिंदुत्वविरोधी विधान करणे, हिंदुत्वाविरुद्ध लेखन करणार्‍यांची नावे डायरीत नमूद आहेत. मराठी भाषेत सांकेतिक शद्बांमध्ये काही संदेश डायरीत आहेत. त्याचा नेमका अर्थ काय आहे, हे संशयितांकडून तसेच हस्ताक्षरतज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न एसआयटी करत आहे. संशयितांपैकी प्रवीण हा संघटना मजबूत करण्यात गुंतला होता. नव्या युवकांना तो संघटनेकडे आकर्षित करत होता. कट्टर हिंदुत्ववादी असणार्‍यांचा शोध तो घेत होता. या संघटनेतील सुमारे साठ सदस्य पाच राज्यांत कार्यरत असल्याचा अंदाज एसआयटीने व्यक्‍त केला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकात संघटना बांधण्यात येत आहे. संशयितांनी भगवान यांच्या हत्येची संपूर्ण तयारी केली होती. गौरी यांच्या हत्येआधीच भगवान यांची हत्या करण्याचा कट होता. डायरीतील माहितीनुसार कर्नाड यांचा क्रमांक शेवटच्या टप्प्यात होता.