Mon, Mar 25, 2019 17:57होमपेज › Belgaon › कुटुंबीयांच्या आठवणीने परशुरामला अश्रू

कुटुंबीयांच्या आठवणीने परशुरामला अश्रू

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:22AMबंगळूर : प्रतिनिधी

गौरी लंकेश यांच्या  हत्येची आणि इतर माहिती परशुराम वाघमारे देत आहे. पण, बोलता बोलता तो भावूक होतो. मध्येच तो रडू लागतो. आपल्या कुटुंबापासून तो दूर राहिल्याचे त्यातच आपल्या लहान भावापासून दूर राहात असल्याचे दु:ख त्याला आहे.  गौरी यांची हत्या करण्याआधी दोन महिने संशयित त्यांच्या घराच्या परिसरातच वावरत होते. परशुराम वाघमारे हा त्यांच्या घरापासून केवळ दहा ते पंधरा मिनिटांवर असणार्‍या भाडेकराराच्या खोलीत राहिला होता. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता आणि 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अनोळखींनी त्याला गौरी यांच्या घरानजीक नेले होते. बंगळूरमध्ये नवखा असल्याने तेथील परिसराची कोणतीच माहिती नसल्याचे परशुरामने चौकशी सांगितले. 

जुलैमध्येच हत्येसाठी पाहणी

या कटाचा सूत्रधार मानला जाणारा अमोल काळेसह सुजीतकुमार यांनी जुलै महिन्यातच गौरी यांच्या घरानजीक पाहणी केली होती. त्यानंतर सिगेनहळ्ळी, यशवंतपूर आणि सुंकदकट्टे अशा तीन ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले होते. त्यानंतर ते तीनवेळा बंगळुरात आले होते. मात्र, परशुराम हा हत्येपूर्वी बंगळुरात आल्याची खात्री होऊ शकलेली नाही. योग्य वेळेत गौरी लंकेश यांच्या घरापर्यंत पोचण्यासाठी आणि हत्येनंतर त्वरित तेथून फरारी होण्यासाठी नजीकच परशुराम आणि मोटारसायकलस्वाराला राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 3 सप्टेंबर रोजी परशुराम बंगळुरात दाखल झाला. त्याला एका अनोळखी मोटारसायकलस्वाराने बसस्थानकावरून नियोजित ठिकाणी पोचवले. मुख्य रस्त्यावरून गेल्यास भविष्यात त्याला हा रस्ता ओळखता येईल म्हणून त्याला आड मार्गाने नेण्यात आले. दरम्यान, काळेच्या डायरीत नमूद करण्यात आलेला सांकेतिक शद्ब ‘गोशाळा’ याचा अर्थ सापडला असून तो गौरी यांच्या घरासाठी वापरण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आणखी दोघे संशयित

सुरेश नामक व्यक्‍तीने काळे व इतर संशयितांची राहण्याची व्यवस्था केली हेाती. त्यांना नेण्यासाठी दोन मोटारसायकलीवरून दोघेजण आले होते. त्यामुळे केवळ परशुराम नव्हे तर आणखी दोघे शुटर तेथे आल्याची माहिती एसआयटीला मिळाली आहे. हत्या झालेल्या दिवशी गांधीनगर ते राजराजेश्‍वरीनगरातील गौरी यांच्या निवासापर्यंत आणखी एका मोटारसायकलीवरून दोघा संशयितांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला असण्याची शक्यता आहे.

मुलाला मारहाण नाही : जानकीबाई

परशुराम वाघमारेची आई जानकीबाई यांनी मुलाला अटक झाल्यानंतर चार दिवसांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. एसआयटीला या घटनेबद्दल सांगून परशुरामला भेटण्याची परवानगी घेण्यात आली. पण, केवळ तासभर त्यासाठी वेळ देण्यात आला. पोलिसांनी आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारची मारहाण केली नसल्याचे जानकीबाई यांनी विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. हत्येमध्ये सामील असल्यास तशी कबुली पोलिसांसमोर देण्याचे मुलाला सांगितले आहे. हत्येचा संबंध नसला तरी जे सत्य आहे ते सर्वकाही पोलिसांना कळविण्याचेही त्याला सांगितले. लवकरच घरी येईल, असा विश्‍वास मुलाने दाखविल्याची माहिती जानकीबाईंनी दिली.