Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या: संशयिताची बेळगावात चौकशी

गौरी लंकेश हत्या: संशयिताची बेळगावात चौकशी

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 12 2018 1:34AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील संशयित के. टी. नवीनकुमार याला बेळगावात आणून चौकशी करण्यात आली आहे. त्याने गेल्या मे व जून महिन्यात बेळगावला भेट दिली होती, अशी माहिती तपासणी पथकाला मिळाली आहे. 

नवीनकुमारला एसआयटी अधिकार्‍यांनी शनिवारी बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात आणले होते. गेल्या वर्षी मे आणि जूनमध्ये नवीनकुमार याने बेळगाव आणि परिसरामध्ये भेट दिल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली आहे. यावरून अधिक माहिती मिळविण्यासाठी या पथकाने नवीनकुमारला घेऊन या भागात चौकशी केली. तपासादरम्यान नवीनकुमार याने अधिकार्‍यांना गोंधळात टाकणारी माहिती दिली आहे, असे एसआयटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

नवीनला शनिवारी बेळगाव आणि खानापुरातील काही ठिकाणी नेण्यात आले. त्याचबरोबर उत्तर कर्नाटकातील आणखी काही शहरांमध्येही फिरवून पुरावे जमवण्याचा प्रयत्न विशेष तपासणी पथक करत आहेत. नवीनकुमारने मारुती ओमनी गाडीतून चामराजनगर कोळ्ळगाल आणि परिसरामध्ये भेटी दिल्याची माहिती सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून एसआयटीच्या हाती लागली आहे.

खानापूरच्या जंगलात तपास

कोळ्ळगाल येथील पेट्रोलपंपवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजनुसार नवीनकुमार व्हॅनमध्ये चालकाच्या आसनावर बसल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. पंपावरील कर्मचार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीनकुमार व त्याचे सहकारी व्हॅनमध्ये असल्याचे सांगण्यात आलेे. नवीनकुमारला गुलबर्ग्याला नेऊन तेथेही चौकशी करण्यात आली. साहित्यक व संशोधक डॉ एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणामध्येही सहभाग आहे का, हा तपास करण्यात येत आहे. डॉ. एम. एम. कलबुर्गीच्या हत्या प्रकरणातील संशयिताचा खानापूर तालुक्यातील माणिकवाडीच्या जंगलात खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

पण प्रत्यक्षात हा खून रायबागच्या तरुणाचा होता. तो खून त्याच्या कुटुंबातील लोकांनीच मालमत्तेच्या वादातून केला होता. पण त्या तरुणाचा चेहरा कलबुर्गी हत्येतील संशयिताशी जुळत असल्यामुळे संशयिताचा नंतर उजव्या संघटनांनी हत्या केली, असा अंदाज व्यक्त झाला होता. त्यामुळे चौकशीासाठी तत्कालीन एसआयटी प्रमुख हेमंत निंबाळकर यांनी बंगळूरहून खानापूरला येऊन चौकशी केली होती.

पद्मावतचा संदर्भ

राणी पद्मावतीच्या जीवनावर आधारित पद्मावत चित्रपट बेळगावातील प्रकाश थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर 25 जानेवारीला संध्याकाळी थिएटरच्या आवारात पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आला होता. त्याबद्दल फेब्रुवारीमहिन्यात खानापूरजवळच्या हलकर्णी गावातून संभाजी पाटील या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी बंगळूरच्या पथकाने खानापुरात चौकशी केली होती.

नवीनकुमार कोण?

के. टी. नवीनकुमार हा मूळचा चिक्‍कमंगळूर जिल्ह्यातील बिरुर शहराचा रहिवाशी आहे. सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी त्यांचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याला सुरुवातील पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक  बंदूक  आणि 15 गोळ्या सापडल्या. चौकशीनंतर त्याचा गौरी लंकेश हत्येत सहभाग असल्याची माहिती बाहेर आली. त्यानंतर त्याला हत्याप्रकरणात अटक झाली.