Mon, Mar 25, 2019 17:40होमपेज › Belgaon › वाघमारे हाच गौरी लंकेश यांचा मारेकरी

वाघमारे हाच गौरी लंकेश यांचा मारेकरी

Published On: Sep 05 2018 2:12AM | Last Updated: Sep 05 2018 2:12AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला बुधवारी (ता. 5) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या आधीच विशेष पोलिस तपास पथकाने (एसआयटी) त्यांचा मारेकरी परशुराम वाघमारे हाच असल्याचे पुरावे मिळवले आहेत.  देशात प्रथमच पोडियाट्रिक गेट अ‍ॅनॅलिसिसचा वापर करून मारेकरी कोण, यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

गुजरातमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पोडियाट्रिक गेट अ‍ॅनॅलिसिस करण्यात आले. तेथून अहवाल उपलब्ध झाल्याने अटकेत असणारा परशुराम हाच मुख्य संशयित असून त्यानेच 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे दिसून आले आहे. हत्या झाल्यापासून एसआयटी अधिकारी संशयितांच्या मागावर होते. दिवसरात्र प्रकरणाचा तपास करण्यात आला. परशुरामला अटक केल्यानंतर त्याने आपणच गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगितले होते. 

घटनास्थळापासून जवळच असलेल्या सीसी टीव्ही कॅमेर्‍यामध्ये 6 सेकंदांपर्यंत त्याची छबी कैद झाली होती. त्यावेळी त्याने डोक्यावर हेल्मेट घातले होते. हत्येची कबुली दिल्यानंतर परशुरामला घटनास्थळी नेण्यात आले. पुन्हा एकदा हत्या कशी केली, ते दाखविण्यास सांगितले. त्याचे चित्रीकरण करून गौरी यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेज तपासण्यात आले. 
दोन्ही दृश्ये तपासल्यानंतर सीसी टीव्ही फुटेजमधील व्यक्‍ती परशुरामच असल्याचे प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

परशुरामने दिली होती कबुली

घटनास्थळावर मिळालेल्या पायाच्या ठशांवरून परशुराम हाच मारेकरी असल्याचे शिक्‍कामोर्तब करण्यात आले. एसआयटीने काही संशयितांना अटक केल्यानंतर मारेकर्‍यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये परशुरामचाही समावेश होता. त्याला अटक झाल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली होती. गौरी लंकेश हिंदुत्वाच्या विरोधात होत्या. त्यांनी केलेली विधाने ऐकली होती. त्यामुळे त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, असे परशुरामने सांगितल्याची माहिती एसआयटी अधिकार्‍यांकडून मिळाली आहे.

देशात प्रथमच या तंत्राचा वापर

कोणत्याही गुन्हे प्रकरणात पोडियाट्रिक गेट अ‍ॅनॅलिसिसचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 18 वर्षांपूर्वी लंडनमध्ये एका गुन्हे प्रकरणात या तंत्राचा वापर करण्यात आला होता. सीसीटीव्हीत कैद झालेली व्यक्‍ती 5.2 इंच असल्याचे नोंद करण्यात आले होते. बूट आणि हेल्मेट घातल्यास उंची 5.4 इंच होते. संशयित अमोल काळे, अमित दिगवेकर आणि सुजितकुमार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे परशुरामला अटक करण्यात आली. त्याला घटनास्थळी नेण्यात आले. 5 सप्टेंबरला काय केले होते, याची चित्रीकरणासह माहिती घेण्यात आली. घटनास्थळावर मिळालेल्या पायांच्या ठशांवरून परशुराम हाच मारेकरी असल्याचे शिक्‍कामोर्तब करण्यात आले.