Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Belgaon › दोन संशयितांना हुबळी येथे अटक

दोन संशयितांना हुबळी येथे अटक

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:46PMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना हुबळी येथे विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. अमित रामचंद्र बद्दी आणि गणेश मिस्कीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही बनशंकरी मंदिर गल्‍ली परिसरातील राहणारे आहेत. एसआयटी अधिकारी एम. एन. अनुचेत यांनी याबाबतची माहिती दिली. 

दोघांना येथील एसीएमएम न्यायालयात हजर करण्यात आले असून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 6 ऑगस्टपर्यंत त्यांच्या कोठडीची मुदत असेल. अमित हा व्यवसायाने सराफ आहे. सोन्याचे दागिने बनविण्याचे काम तो करतो. तर गणेश हा उदबत्ती तयार करून विक्री करतो. दोघांवरही बेकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच याआधी अटक करण्यात आलेला संशयित मोहन नायक याच्याशी संपर्कात असल्याचा आरोप आहे. सोमवार दि. 22 रोजी एसआयटीने हुबळीत ही कारवाई केली.

याद्वारे या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या नऊवर गेली आहे. याआधी के. टी. नवीनकुमार, अमोल काळे, अमित देगवेकर, परशुराम वाघमारे, सुजीत कुमार, मनोहर एडवे, मोहन नायक यांना अटक करण्यात आली आहे. अमित आणि गणेशच्या मोबाईलवरील कॉल्सची तपासणी एसआयटीने केली. गेल्या अनेक दिवसांपासून लाखो कॉल्स तपासण्यात आले. त्यानंतर हुबळीतील दोघा संशयितांवर नजर ठेवण्यात आली होती. शहरामध्ये ते असल्याचे समजल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.