Thu, May 28, 2020 09:57होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या प्रकरण : एसआयटीकडून तीन दुचाकी ताब्यात

गौरी लंकेश हत्या प्रकरण : एसआयटीकडून तीन दुचाकी ताब्यात

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:58AMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी हुबळीत काही दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या अमित बद्दी आणि गणेश मिस्कीन यांना विजापूरला नेण्यात आले असून मुख्य संशयित परशुराम वाघमारेशी झालेल्या बैठकीच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली.  तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेल्या मोटारसायकलीचा शोध घेण्यात येत असून तीन दुचाकी जप्‍त करण्यात आल्या आहेत.

संशयितांपैकी गणेशच्या भावाला चौकशीसाठी बंगळूरला बोलाविण्यात आले आहे. हत्येबाबत त्याच्याकडे काही माहिती आहे का, हा तपास सुरू आहे. दरम्यान, दोन्ही मुलांची चौकशी होत असल्याचा धक्‍का सहन न झाल्याने त्यांची आई अस्वस्थ असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स येथे उपचार सुरू आहेत. हत्येपूर्वी संशयितांची विजापुरात बैठक झाली होती. त्या ठिकाणाची पाहणी एसआयटीने केली आहे.

गौरी लंकेश हत्येला वर्ष होत आले, तरी प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यात अपयश आले आहे. तर संशयितांना इशारे देणार्‍या निहाल ऊर्फ दादा याला अटक करणे शक्य झाले नाही. आतापर्यंत अटक केलेल्या संशयितांपैकी परशुराम वाघमारेने गौरी यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडल्याचे पुढे आले आहे. नवीन कुमारने त्याला पिस्तूल दिली. सरकारी कर्मचारी राजेश बंगेराने काडुतसे, पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिले. हत्येनंतर सुरेश याने पुरावे नष्ट केले. अमोल काळे याने गौरी हत्येचा नियोजनबद्ध कट आखल्याचे चौकशीतून उघडकीस आले आहे. मात्र, हत्येमागील संघटना, मुख्य संशयित, हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल, पिस्तूल याचा शोध एसआयटीला घेता आलेला नाही. वाघमारेकडून हत्या होणार ही माहिती केवळ ते सांगणार्‍याला आणि वाघमारेला होती. इतर कुणालाही याबाबत माहीत नव्हते.

संशयितही अनभिज्ञ

संशयितांनी एकमेकाला आपली खरी नावे कधीच सांगितली नाहीत. घातक कारवाईसाठी निवड झाल्यानंतर संबंधित युवकावर काही दिवस नजर ठेवली जात होती. त्यानंतरच त्यांना मोबाईल क्रमांक देण्यात येत होता. ते एकमेकांशी कोडवर्डमध्ये बोलत होते. कुणाशीही संपर्क साधावयाचा असेल तर कॉईन बॉक्स किंवा टेलिफोन बुथवरून ते बोलत होते. आपले विचार आणि कृत्यांबाबत त्यांनी कुणाशीही बोलायचे नाही, असे अलिखित नियम होते.