Sun, Oct 20, 2019 01:07होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या प्रकरण : पिस्तूल शोधार्थ एसआयटी मुंबईला

गौरी लंकेश हत्या प्रकरण : पिस्तूल शोधार्थ एसआयटी मुंबईला

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:19PMबेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मास्टरमाईंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या संशयित अमोल काळेने दिलेल्या माहितीनुसार विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबईला रवाना झाले आहे. 

या हत्येमागील सूत्रधार असणारा निहाल ऊर्फ दादा याच्याबाबत अमोल काळेने काही माहिती दिल्याचे समजते. काळेने दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील नालासोपारा येथे महाराष्ट्र एटीएसने वैभव राऊत याला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्‍त केले. निहाल ऊर्फ दादाने गेल्या 5 वर्षांमध्ये कर्नाटकातील सुमारे 60 जणांची विध्वंसक कारवायांसाठी संघटनेत भरती केली होती. त्यानेच महाराष्ट्रातून पिस्तूल पाठविल्याचा संशय कर्नाटक एसआयटीला आहे.  

वाघमारेला कराटे प्रशिक्षण

गौरी हत्येप्रकरणी एसआयटीच्या अटकेत असणार्‍या परशुराम वाघमारेला केवळ पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षणच नव्हे तर कराटे आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

काही दिवसांपूर्वी बेळगावातून अटक करण्यात आलेला भाजी व्यापारी, धाबा चालक भरत कुरणे याच्या मालकीच्या शेतात हे प्रशिक्षण देण्यात आले. कुरणेचे शेत बेळगाव शहरापासून 20 कि. मी. अंतरावर असणार्‍या जांबोटीनजीक आहे. पश्‍चिम घाट परिसरात हे शेत असून हा परिसर निर्जन आहे. त्या ठिकाणी कुणीच येत नसल्याने तेथे वाघमारेला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्येनंतर कुणी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यास स्वसंरक्षणासाठी कराटे आणि मार्शल आर्ट शिकण्याची सूचना त्याला करण्यात आली. त्यानुसार पिस्तूल व इतर प्रशिक्षणासाठी तो दिवसभर तेथे राहात होता. त्या ठिकाणी अनेकजण दिवसभर वावरत होते.

परिसरात हॉटेल, कूपनलिका, तलाव असल्याने सहलीच्या निमित्ताने अनेक युवक-युवती त्या ठिकाणी जात होते. तेथे पार्ट्यांचे आयोजन केले जात होते. पिस्तूल प्रशिक्षण सुरू असताना मोठ्याने संगीत लावले जात होते. त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती. पिस्तुलीचा आवाज आसपासच्या परिसरात येऊ नये, याची खबरदारी घेतली जात होती. 

प्रशिक्षक कोण?

एसआयटीच्या अटकेत असणार्‍या राजेश डी. बंगेराने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे. पण, कराटे आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षण कुणी दिले याबाबत अजूनही स्पष्ट झालेले नाही.