Wed, Jun 26, 2019 23:30होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या : बेळगावातील तपासाबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ

गौरी लंकेश हत्या : बेळगावातील तपासाबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:30AMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा एसआयटी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची चौकशी करण्यासाठी बेळगावात आणले असताना स्थानिक पोलिसांनी कोणताच थांगपत्ता लागू देण्यात आलेला नाही. त्यामुळे याप्रकरणापासून स्थानिक पोलिसांना े अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे.

गौरी लंकेश हत्येप्रकरणाशी संबंधित चौकशी करण्यासाठी संशयित आरोपी परशुराम वाघमारे याला एसआयटी पोलिसांनी दि. 20 जून रोजी बेळगाव येथे आणले होते. त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून खानापूर तालुक्यातील जंगल भागात घेऊन जाऊन चौकशी करण्यात आली आहे. परशुराम याने खानापूर परिसरात बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याचे एसआयटी पोलिसांच्या चौकशीतून पुढे आले होते. यासाठी एसआयटी पोलिसांनी त्याची खानापूर परिसरातील जांबोटी, कणकुंबी आदी भागात घेऊन जाऊन चौकशी केली आहे. या चौकशी प्रकरणाचा थांगपत्ता स्थानिक पोलिसांसह वनाधिकार्‍यांनाही लागू दिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अतिगुप्तपणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तर याप्रकरणाशी संबंधित असणारे आणखी तिघे संशयित बेळगाव  परिसरातील असल्याचेही सांगण्यात येत आहे. या संबंधी बेळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या कपिलेश्‍वर परिसराचे नाव चर्चेत आले आहे. सदर भागातील तिघा संशयितांचा एसआयटी पोलिसांकडून तपास सुरू आहे. सदर तिघा संशयितांचे या भागात 20 दिवस वास्तव्य होते. या दरम्यान स्थानिक एका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आवश्यक व गरजू वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र सदर संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही पूर्णपणे अंधारात ठेवून हे काम करून घेण्यात आले आहे.