Thu, Apr 25, 2019 18:44होमपेज › Belgaon › कुरणेला पुन्हा न्यायालयीन कोठडी

कुरणेला पुन्हा न्यायालयीन कोठडी

Published On: Aug 24 2018 12:41AM | Last Updated: Aug 24 2018 12:02AMहुबळी, बंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) अटक करण्यात आलेल्या बेळगावातील संशयित भरत कुरणे याला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

याआधी त्याला 23 ऑगस्टपर्यंत एसआयटी कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्याने त्याला तिसर्‍या एसीएमएम न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीशांनी 3 सप्टेंबरपर्यंत कुरणेला न्यायालयीन कोठडी देण्यात येत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, कुरणेची चौकशी सुरूच असून त्याच्याकडून आणखी माहिती घेतली जात आहे. त्याला पुन्हा बेळगावात आणून चौकशी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात एसआयटीने तीन दिवस बेळगावातील चिखले, हुबळी परिसरात चौकशी केली. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश या चारही हत्यांमागे असणार्‍या संशयितांनी चिखलेतच शूटिंगचा सराव केल्याचे उघडकीस आले आहे. 5 सप्टेंबरला गौरी लंकेश यांचा स्मृतिदिन आहे. वर्षभरातच एसआयटी लंकेश हत्या प्रकरण सोडविण्याच्या मार्गावर आहे.

बद्दी निर्दोष असल्याचा दावा

अमित बद्दीचा पत्रकार गौरी लंकेश हत्येशी कोणताच संबंध नाही. कोणतेही पुरावे नसताना अटक करण्यात आल्याचा आरोप त्याची पत्नी अंजली आणि आई जयश्री यांनी केला आहे. गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बद्दी कुटुंबीय बोलत होते. अमित याला विनाकारण अटक केली आहे. एसआयटीकडून त्याला थर्ड डिग्री देण्यात आली आहे. कविता लंकेश, इंद्रजित लंकेश, उच्च न्यायालय, गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पूर्ण कुटुंबाचा चरितार्थ अमितवर चालत होता. आता तो एसआयटीच्या अटकेत असल्याने पोटाचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे बद्दी कुटुंबाने सांगितले.