Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या : बेळगावच्या कुरणेच्या शेतात शस्त्रप्रशिक्षण

गौरी लंकेश हत्या : कुरणेच्या शेतात शस्त्रप्रशिक्षण

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 11 2018 1:19AMबेळगाव : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) अटक करण्यात आलेला भरत कुरणे (वय 37, रा. संभाजी गल्‍ली, महाद्वार रोड, बेळगाव) हा बारावा संशयित आहे. चिगुळे-खानापुरातील त्याच्या शेतातच संशयित मारेकरी परशुराम वाघमारे याच्यासह अनेकांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती एसआयटी अधिकार्‍यांकडून मिळाली आहे.

खानापुरातील कुरणे याच्या शेतामध्ये वाघमारेसह अटकेत असणार्‍या सहा संशयितांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती उघड झाली आहे. गौरी हत्येचा कट यशस्वी करण्यासाठी मास्टरमाईंड अमोल काळेने एकूण 13 जणांना निवडले होते. आता बारावा संशयित सापडला असून आणखी एकाचा शोध एसआयटी घेत आहे.

भरत कुरणेला ‘टमाटर’ म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्रातील एका संघटनेशी तो संबंधित होता. एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी यांच्या हत्येनंतर कारमध्ये वाट पाहणार्‍या दोघांपैकी एक भरत होता. हत्येनंतर मोटारसायकलस्वार आणि मारेकर्‍याला सुरक्षित ठिकाणी पोचविण्याची जबाबदारी कारमधील दोघांवर सोपविण्यात आली होती.

कुरणेला पोलिस कोठडी देण्याची मागणी एसआयटीने गुरुवारी पहिल्या एसीएमएम न्यायालयाकडे केली. तिसर्‍या एसीएमएम न्यायालयात गौरी लंकेश हत्येची सुनावणी होत आहे. पण, न्यायाधीश उपलब्ध नसल्याने पहिल्या एसीएमएम न्यायालयात याबाबतची सुनावणी झाली. पाच दिवस न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यावर आक्षेप नोंदविता येणार असल्याचे न्यायाधीशांनी वकिलांना सांगितले. एसआयटी चौकशीवेळी ‘टमाटर’ हे टोपण नाव उघड झाले. गौरी हत्येच्या आदल्या दिवशी कुरणेसह वाघमारे, मिस्कीन, बद्दी या चौघांनी पाहणी केली होती.

एसआयटीने भरतच्या ताब्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तसेच 14 दिवसांची कोठडी मागण्यात आली. मात्र, संशयितांच्या वकिलांनी त्या मागणीला आक्षेप घेत पोलिस कोठडी दिल्यास संशयितांना जबर मारहाण होण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय 13 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला. तोपर्यंत भरत कुरणेसह सारे संशयित न्यायालयीन कोठडीत राहतील.

कलबुर्गी हत्येला मिळणार गती?

विचारवंत साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाडमध्ये राहत्या घरी 31 ऑगस्ट 2015 रोजी हत्या झाली होती. 7.65 एमएम देशी बनावटीच्या पिस्तुलाने त्यांच्या कपाळावर गोळी झाडण्यात आली होती. कुरणेच्या अटकेमुळे या हत्येच्या तपासालाही गती मिळण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती एसआयटीने दिली. चिगुळे-खानापुरातील शेतामध्ये प्रशिक्षण देताना ‘कलबुर्गींप्रमाणे गौरीलाही डोक्यात गोळी मार’ असे प्रशिक्षकाने सांगितले होते. त्यावेळी कलबुर्गींचा मारेकरी तेथे उपस्थित होता, असा संशय एसआयटीला आहे. त्या दिशेनेही आता तपास केला जाणार आहे.

आणखी दोघांचा शोध

एसआयटीकडे एकूण तिघा संशयितांची रेखाचित्रे तयार असून, त्यापैकी भरत कुरणेला त्यांनी अटक केली आहे. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. हे दोघेही बेळगाव परिसरातील असण्याचा संशय आहे. त्यापैकी एकटा हलग्याचा, तर दुसरा युवक कलखांबचा असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. तथापि, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. 

पिस्तूल समुद्रात फेकली

गौरी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल महाराष्ट्रातील समुद्रात टाकून पुरावा नष्ट करण्यात आल्याची माहिती संशयितांनी एसआयटीला दिली आहे. हत्या झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पिस्तूल आणि मोटारसायकल सापडणे आवश्यक आहे. त्याकरिता एसआयटीने संबंधित ठिकाणी समुद्र किनारी जाऊन पिस्तुलाचा शोध चालवला आहे. समुद्रातही शोध घेण्याची तयारी केली जात आहे. हत्येनंतर मास्टरमाइंड अमोल काळे याच्याकडे पिस्तूल सोपविण्यात आली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी विविध मार्ग अवलंबण्यात आले. विधान परिषद सदस्या शांतेयंड वीणा अच्चय्या यांचा स्वीय साहाय्यक राजेश डी. बंगेरा याने प्रशिक्षण आणि हत्येसाठी काडतुसे दिली होती. त्याने दिलेली काडतुसे वापरण्यात आली का, याचा तपास एसआयटी करत आहे.