Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्येप्रकरण: बेळगावातील 3 युवक बेपत्ता

गौरी लंकेश हत्येप्रकरण: बेळगावातील 3 युवक बेपत्ता

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 11:10PMबेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) बेळगावात कसून तपास चालवल्याने हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेले तीन युवक बेपत्ता झाले आहेत. तर बुधवारी ताब्यात घेतलेल्या संभाजी गल्लीतील ढाबामालकाकडे अजूनही चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हत्येबद्दल मंगळुरातील दोन स्थानिक युवकांना अटक करण्यात आली आहे.

हत्येप्रकरणी बेळगावातील आणखी तिघांचा शोध ‘एसआयटी’ घेत आहे. मागील आठवड्यात ‘एसआयटी’  अधिकारी बेळगावात आले  होते. तर बुधवारी कलखांबमधील एकाची चौकशी करण्यात आली होती. हलगा (ता. बेळगाव) येथील परशुराम नामक युवकाचा शोधही ‘एसआयटी’  घेत आहे. एकूण तिघे जण ‘एसआयटी’ च्या हाताला लागल्यास महत्त्वाची माहिती उघडकीस येणार आहे. हे तिघेही सध्या बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बेळगावच्या संभाजी गल्लीतील ढाबामालकाला ताब्यात घेतल्यानंतर  त्याच्याकडून काही माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. त्याची चौकशी बंगळुरात सुरू असून दुसर्‍याच दिवशी मंगळुरातील दोघांना अटक करण्यात आली. 

संदेश शेट्टी पादेबेट्टू (वय 28) आणि युवराज कचिनकड (30) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही पडुबिद्री (जि. मंगळूर) येथील राहणारे आहेत. ते एका संघटनेशी संबंधित असून दोघेही लंकेश हत्येतील संशयितांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. त्या दोघांना ताब्यात घेऊन बंगळूरला आणण्यात आले आहे.