Tue, Apr 23, 2019 05:36होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या प्रकरण : ‘त्या’ पिस्तूलचा मालक कोण?

गौरी लंकेश हत्या प्रकरण : ‘त्या’ पिस्तूलचा मालक कोण?

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 18 2018 12:16AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी प्रमुख संशयित आरोपी परशराम वाघमारे याच्याकडून वापरलेल्या ‘त्या’ पिस्तूलच्या मालकाच्या शोधात विशेष तपास पथक (एसआयटी) गुंतले आहे. अन्य तीन संशयितांचाही कसून तपास सुरू आहे.

लंकेश हत्या प्रकरणात वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले आहे.  प्रकरणाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाघमारे याने गौरी लंकेश यांच्या हत्येची शनिवारी कबुली दिली आहे. न्यायालयात सदर आरोप सिद्ध होण्यासाठी पिस्तूल मालक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. हत्येच्या आधी दोन तास वाघमारेला पिस्तुल  देण्यात आली होती. ‘त्या’   व्यक्तीबद्दल वाघमारेला कोणतीही माहिती नाही. चौकशीदरम्यान त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे ‘एसआयटी’ला सांगितले आहे. यामुळे पिस्तूल मालकाविषयी गूढ आहे.

दरम्यान, 5 सप्टेंबर 2017 रोजी सायंकाळी एका अनोळखीने राजराजेश्‍वरीनगर येथील घरात बोलावून घेतले. हत्या करण्यापूर्वी केवळ काही तासापूर्वी पिस्तुल ताब्यात दिली. 
हत्येानंतर ताबडतोड पिस्तूल त्याने ताब्यात घेतले. ही व्यक्ती आपल्या ओळखीची नसल्याचे वाघमारेने सांगितले आहे. यामुळे 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान वाघमारेसोबत असणार्‍या तिघांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या मदतीने पिस्तूल मालकाचा शोध घेणे पथकाला शक्य होणार आहे. 

सध्या न्यायालयीन कोठडीत असणारे अमोल काळे, अमित डेगवेकर, प्रदीप आणि मनोहर यडवे यांच्याकडेही पिस्तूलबाबत चौकशी करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडून अधिक माहिती अधिकार्‍यांना मिळू शकलेली नाही.  न्यायालयात आरोप सिद्ध करण्यासाठी पिस्तूल आणि दुचाकी मालक यांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आणि गोवा या राज्यात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे जाळे असून यामध्ये सुमारे 60 जहाल कार्यकर्ते सक्रिय असल्याचा संशय आहे. त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्य असून त्यांचाही हात असण्याची शक्यता अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येते.  

वडिलांनी घेतली परशुरामची भेट

संशयित आरोपी परशुराम वाघमारे याची  वडील अशोक यांनी शनिवारी भेट घेतली. माझा मुलगा निर्दोष आहे. मी त्याची भेट घेऊन चर्चा केली आहे. पुढील भेटीवेळी आईला घेऊन येण्याची सूचना परशरामने केली आहे. पोलिसांनी पाच दिवसांनी हजेरी लावण्याचे सुचविल्याचे त्यांनी सांगितले. श्रीराम सेनेचे विजापूर  जिल्हाध्यक्ष राकेश मठ यांची पोलिसांनी सलग नऊ तास चौकशी केली. राकेश हे वाघमारेचे मित्र आहेत. तपासानंतर पुन्हा तपासासाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती दिली. परशुराम आपला मित्र असून त्याच्याशी अनेक वर्षांपासूनचा परिचय आहे. तो पूर्णपणे निर्दोष असल्याचे राकेश म्हणाले.