Fri, May 24, 2019 06:25होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या प्रकरण : बेळगावचे ‘ते’ आणखी दोघे कोण?

गौरी लंकेश हत्या प्रकरण : बेळगावचे ‘ते’ आणखी दोघे कोण?

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:22PMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी एसआयटीने बेळगाव महाद्वाररोड संभाजी गल्ली येथील भरत  कुरणेला अटक केल्यानंतर आणखी दोघांचा शोध चालवला आहे. ते दोघे कोण, त्यांची नावे काय, व्यवसाय काय हे पोलिसांनी जाहीर केलेले नाही. त्यामुळे ते दोघे कोण, हाच प्रश्‍न बेळगावकरांसमोर आहेत. 

गौरी लंकेश यांची हत्या करणार्‍या आणि सध्या अटकेत असलेल्या संशयित आरोपींना हत्येनंतर ओम्नी कारमधून सोडण्याची भूमिका भरत कुरणेने बजावल्याचा एसआयटीचा दावा आहे. त्यामुळे भरतचा प्रत्यक्ष हत्येत सहभाग आहे का, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. भरतला अटक केल्यानंतर एसआयटीने बेळगाव परिसरात  आणखी काही ठिकाणीही संशयितांचा शोध जारी ठेवला आहे. एसआयटीकडे बेळगाव परिसरातील तीन युवकांची रेखाचित्रे असून, त्यापैकी एक भरतचे होते, असे मानले जाते. त्यामुळे आता दोघांचा शोध एसआटी पोलिसांनी जारी ठेवला आहे. एसआयटीने भरत कुरणेला अटक करून बंगळूरन्यायालयात हजर केले. त्याला सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. 

तथापि, एसआयटीने भरतला अटक केल्यानंतर त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. व्यवसायाने धाबाचालक असलेला भरत मनमिळावू स्वभावाचा आहे. त्याने कष्टातून हा व्यवसाय उभारला. खानापूर तालुक्यातील चिगुळे येथे त्याने रिसॉर्ट सुरू केले होते. मात्र,वनखात्याने आक्षेप घेतल्याने बंद करावा लागला होता.त्यानंतर त्याने वंटमुरीजवळ महामार्गावर धाबा सुरू केला आहे. बेळगाव भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यवसायाही तो करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. भाजीमार्केटमध्ये मुख्यतः टोमॅटो व्यापार करीत असल्याने त्याला टोमॅटो या टोपणनावाने ओळखले जाते. त्याने अगसगे, केदनूर परिसरात शेतजमीन घेऊन बकरी पालनाचा व्यवसायही केला होता.

कुरणेला 11 दिवसांची पोलिस कोठडी

भरत कुरणेची रवानगी आता 11 दिवसांसाठी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. सोमवारी बंगळुरातील तिसर्‍या एसीएमएम (अ‍ॅडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट) न्यायालायाने हा आदेश दिला. भरत आता 11 दिवस एसआयटीच्या ताब्यात असेल. एसआयटीने 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने 11 दिवसांचीच कोठडी मंजूर केली. भरतच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला. मात्र प्रकरणाचा उलगडा व्हावा यासाठी न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली.

कुरणेचा सामाजिक कार्यात पुढाकार

एसआयटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातच कुरणे याच्या शेतवडीत बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण मारेकर्‍यांनी घेतले होते. तथापि, भरतने त्याचा इन्कार केला आहे. ‘संशयित आरोपींना आश्रय दिला होता. पण, ही मदत ते हिंदू धर्मासाठी कार्य करत असल्याच्या माहितीवरून केली होती,’ असे त्याचे म्हणणे आहे. भरत कुरणे अनेक सामाजिक कार्यक्रमाुमध्ये हिरिरीने पुढाकार घेत होता. संशयित मारेकरी गौरी लंकेश हत्ये प्रकरणाशी संबंधित असल्याचे त्याला माहीत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.