Sat, Apr 20, 2019 10:13होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या : परशुरामला प्रवृत्त करणारे कोण?

गौरी लंकेश हत्या : परशुरामला प्रवृत्त करणारे कोण?

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 1:35AMबंगळूर : प्रतिनिधी

‘गौरी लंकेश यांची हत्या करण्याआधी शस्त्र(बंदूक चालविण्याचे) प्रशिक्षण मी 15 दिवस बेळगावमध्ये घेतले’ अशी सनसनाटी कबुली या हत्या प्रकरणातील शूटर परशुराम वाघमारेने दिली आहे. मी बेळगावात एअरगनने प्रशिक्षण घेत होतो, असेही त्याने म्हटले आहे.

विजापूर जिल्ह्यातील सिंदगीचा मूळ रहिवासी असलेल्या परशुरामला चार दिवसांपूर्वी विशेष तपास पथकाने (एसआयटी) महाराष्ट्रातून अटक केली. त्यानंतर त्याच्या चौकशीतून नवी माहिती पुढे येत आहे.

‘गौरी कोण होत्या, हे आधी मला माहीत नव्हते. त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चार दिवस आधी यू ट्यूबवरून त्यांचे भाषण ऐकून त्यांच्याबद्दल माहिती मिळवली. त्यांच्यावर गोळ्या मीच झाडल्या. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी मी ही हत्या केली; पण आता पश्‍चाताप होत आहे’, अशीही कबुली परशुरामने दिली आहे.

परशुरामने एसआयटीला दिलेली माहिती अशी ः गौरी हत्येच्या काही दिवस आधी ऑगस्ट 2017 मध्ये मला एक अनोळखी व्यक्ती सिंदगीमध्ये येऊन भेटली. त्याने माझी बरीच माहिती मिळवली होती. मला भेटल्यानंतर तो अनोळखी म्हणाला, ‘तू कट्टर हिंदू आहेस, धर्मरक्षणासाठी तुझ्याकडून भरीव कार्य होणे गरजेचे आहे. लवकरच तुझ्यावर एक जबाबदारी सोपवली जाईल. ती जबाबदारी पार पाडण्याचे धाडस तू दाखवले तर तुझ्या पाठीशी आम्ही उभे राहू,’ असे त्या अनोळखीने मला सांगितले. ती व्यक्ती कन्नड आणि हिंदी बोलत होती. हिंदू धर्म वाचवायचा असेल तर गौरी लंकेशला मारले पाहिजे. तुझ्याकडून शक्य आहे का सांग? दोन दिवसांत उत्तर दे. होत नसेल तर सांग, आम्ही दुसरा कोणीतरी या कामासाठी शोधतो, असेही ती व्यक्ती म्हणाली. त्यानंतर दोन दिवसांनी मी माझी तयारी असल्याचे त्या अनोळखीला सांगितले.

5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्याच्या आदल्या दिवशीही मी त्यांच्या घरासमोर थांबलो होतो. पण, गौरी त्या दिवशी खूपच उशिरा आल्या. जास्त वेळ थांबलो असतो तर संशय आला असता, म्हणून लवकर परतलो. दुसर्‍या दिवशी मात्र नेम साधला. आता मला पश्‍चाताप होत आहे. त्यांची हत्या मी करायला नको होती, असेही परशुरामने एसआयटीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

आता शोध कलबुर्गींच्या मारेकर्‍यांचा

लंकेश  हत्येचा तपास लावल्यानंतर आता प्रसिद्ध संशोधक व लेखक डॉ. एम. एम. कुलबुर्गी यांच्या हत्येचा शोध लावण्याकडे राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा शोध लावण्यासाठी  डीसीपी अनुचेत हे विशेष तपास पथकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आले आहेत. त्यासाठी राज्य सरकार एका आठवड्याच्या कालावधीतच अधिसूचना काढण्याच्या तयारीत आहे.  डॉ.  कलबुर्गी यांची हत्या गौरी यांच्या हत्येच्या दोन वर्षे आधी झाली. पण, अजून मारेकर्‍यांचा तपास लागलेला नाही. आता हा तपास वेग घेण्याची शक्यता आहे.

हत्याकाळात मोबाईल व दूरध्वनीवर झालेले कॉल्स तपासण्यामध्ये खूपच वेळ गेला.  लंकेश हत्येनंतर केवळ 5 महिन्यांमध्ये दीड कोटीपेक्षा जास्त दूरध्वनी कॉल्स तपासले गेले, असे तपास पथकाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले. गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी ज्या पिस्तुलाचा वापर करण्यात आला त्याच पिस्तुलाने एम. एम. कलबुर्गी यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

परशुराम वाघमारे व अमोल काळे यांच्याकडे डॉ. कलबुर्गी हत्येबद्दल विचारणा केली असता त्या हत्येमध्ये आपला सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या एका डायरीमध्ये साहित्यिक-अभिनेते गिरीश कर्नाड यांचेही नाव त्यांच्या हिटलिस्टवर होते असे आढळून आले आहे. जे हिंदूविरोधी असतील त्यांचे नाव ते हिटलिस्टमध्ये दाखल करीत होते, हे तपासामध्ये उघड झालेले आहे. 

हत्या करण्याच्या कटामध्ये निहाल उर्फ दादा याच्यासह आणखी तिघांना अटक करण्यात यश मिळविल्यानंतर गौरी लंकेश हत्येचा तपास पूर्ण होणार असल्याचे तपास पथकाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

कॉ. पानसरेंची हत्या त्याच पिस्तूलने

कोल्हापुरात 20 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या गोळ्या घालून झाली. त्यासाठी वापरण्यात आलेले 7.65 मिमीचे पिस्तूलच डॉ. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्या करण्यासाठी वापरण्यात आल्याचे एसआयटीने शुक्रवारी म्हटले होते. त्यामुळे तिन्ही हत्यांचा संबंध एकमेकांशी जोडला गेला आहे.

अमोल काळेवर जबाबदारी यादीची

अमोल काळेवर कर्नाटकमध्ये हिंदूविरोधी कोण कोण वक्तव्ये करतात, त्यांची यादी तयार करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, असे तपासामध्ये उघड झालेले आहे. हिंदूविरोधी असलेल्या साहित्यिक व स्वामी यांच्यासह राज्यातील 10 व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर अमोल काळेने इतर राज्यांतील 16 जणांची नावे हिटलिस्टमध्ये समाविष्ट करून, ती यादी हत्या करू इच्छिणार्‍या गटाला दिली होती.

ती व्यक्ती कोण?

लंकेश यांची हत्या करण्यास परशुरामला प्रवृत्त करणारी ती व्यक्ती कोण, याचा शोध आता सुरू आहे. ती व्यक्ती अमोल काळे असण्याची शक्यता आहे.  हत्या करण्यापूर्वी गौरी लंकेश यांचा उल्लेख  ‘ऑपरेशन अम्मा’, असा केल्याचे आढळून आले आहे.  लंकेशच्या मारेकर्‍याला ‘मुन्ना’ या कोडवर्डने ओळखले जात होते. सर्व कोडवर्डने देवनागरी भाषेमध्ये लिहिण्यात आले होते.

फक्त अटकेची कल्पना :  जिल्हा पोलिसप्रमुख 

विजापूर जिल्ह्यातून परशुराम वाघमारेला अटक करण्यात आल्याची आम्हाला कल्पना आहे. मात्र, त्यानंतर गौरी लंकेश हत्या प्रकरणातील चौकशीसाठी एसआयटीने बेळगाव पोलिसांशी संपर्क साधलेला नाही, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख सुधीरकुमार रेड्डींनी ‘पुढारी’ला दिली.
रेड्डी म्हणाले, वाघमारे याने शस्त्र प्रशिक्षण बेळगावात घेतल्याची कबुली दिली असली तरी त्याबाबत आमच्याकडे विचारणा झालेली नाही. लंकेश हत्या प्रकरणाशी बेळगावचा संबंध आहे, असे संशयितांनी सांगितले असले तरी अद्याप तपासाचे निर्देश आलेले नाहीत.