Sun, Jul 21, 2019 07:57होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्याप्रकरण : पिस्तूल महाराष्ट्रातून?

गौरी लंकेश हत्याप्रकरण : पिस्तूल महाराष्ट्रातून?

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 10:35PMबंगळूर / बेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी मुंबईतून पिस्तूल आणण्यात आल्याचा संशय कर्नाटक विशेष तपास पथकाला (एसआयटी) आहे. यामुळे लवकरच हे पथक मुंबईला जाऊन तपास करणार आहे.  बेळगावातून अटक करण्यात आलेल्या भरत कुरणेच्या शेतात हत्येत सहभाग असणार्‍यांपैकी चौघांनी पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील नालासोपारा येथे वैभव राऊतच्या घरावर छापा घालून त्याच्यासह तिघांना महाराष्ट्रातील एसआयटीने अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्‍त करण्यात आले. काही शस्त्रेही सापडली. गौरी हत्येप्रकरणी अटकेत असणारा मास्टरमाईंड अमोल काळेने चौकशीवेळी वैभव राऊतचे नाव घेतले होते. त्यामुळे या हत्येचे कनेन्शन महाराष्ट्राशी असल्याच्या दिशेने कर्नाटक एसआयटी तपास करणार आहे. 

दरम्यान, बेळगावातून अटक करण्यात आलेला हॉटेल व्यावसायिक भरत कुरणे याच्या शेतात गौरी यांच्या हत्येत सहभाग असणारे परशुराम वाघमारे, गणेश मिस्कीन, अमित बद्दी यांनी पिस्तूल प्रशिक्षण घेतले होते. विधान परिषद सदस्या वीणा अच्चय्या यांचा स्वीय सचिव आणि सध्या एसआयटीच्या अटकेत असलेला संशयित राजेश डी. बंगेरा याने त्यांना प्रशिक्षण दिले होते.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथे समांतर संघटना बांधण्यात आल्याचे तपासावेळी समजून आले आहे. यासाठी 60 युवकांना संघटनेत सामील करण्यात आले. त्यापैकी 22 युवकांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी एसआयटीने मंगळूर येथील संदेश शेट्टी व युवराज काचिनडक यांना ताब्यात घेतले होते. राजेश बंगेराशी असणार्‍या त्यांच्या संबंधांबाबत चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतही गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांचा हात असल्याचा सुगावा लागला आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे. 

कलबुर्गी हत्येत काळे?

गौरी हत्याप्रकरणी अटकेत असणार्‍या काही संशयितांचा विचारवंत साहित्यिक डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे. यापैकी मोटारसायकलवरील एकजण मास्टरमाईंड अमोल काळे होता. आता मारेकर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. या संशयितांनाही राजेश बंगेरानेच प्रशिक्षण दिल्याचे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले.