Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Belgaon › बेळगाव, सातार्‍यात गोळीबाराचे प्रशिक्षण दिल्याचे ‘एसआयटी’ चौकशीत उघड

गौरी लंकेश हत्या : परशुराम वाघमारेच शूटर

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:29AMबेळगाव/ बंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर परशुराम वाघमारेनेच गोळ्या झाडल्याचे ‘एसआयटी’च्या (विशेष तपास पथक) चौकशीत निष्पन्‍न झाले आहे. त्यातही सनसनाटी माहिती म्हणजे, परशुरामला पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण बेळगाव आणि सातार्‍यात देण्यात आले होतेे, असेही तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.परशुरामला गोळीबाराचे प्रशिक्षण बेळगाव आणि सातार्‍यामध्ये देण्यात आले होते, असे उघडकीस आले आहे. 

पुण्याचा इंजिनिअर अमोल काळे याने त्याला बंदूक, पिस्तूल चालवण्यास शिकवले, असेही निष्पन्‍न झाले आहे. त्याला अमित देगवेकर ऊर्फ प्रदीप महाजन याने मदत केली. या प्रकरणात अमोल काळे आणि अमित देगवेकर हेही संशयित असून, ते दोघेही अटकेत आहेत.साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची धारवाडमध्ये हत्या झाल्यानंतर तपासासाठी पोलिसांनी खानापूरचा जंगल परिसरही पिंजून काढला होता. शिवाय, गौरी हत्येचे मडगावशीही कनेक्शन असल्याचा संशय आहे.

गौरी यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या घरासमोरच झाली होती. त्यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिल्या गोळीचा नेम चुकला, तर तीन गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या होत्या. या गोळ्या आपण झाडल्याची कबुली परशुरामने  ‘एसआयटी’कडे दिली आहे.

अमोल काळे सूत्रधार

गौरी हत्या प्रकरणाचे संपूर्ण कारस्थान अमोल काळेने रचले होते. त्याने आधी नियोजन केले आणि मग समविचारी युवकांना एकत्र आणण्याची योजना आखली, असे ‘एसआयटी’चे म्हणणे आहे. त्याने आधी योजना आखली. त्यानंतर तो हिंदू संघटनांच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावू लागला. तेथे त्याने काही युवकांशी चर्चा चालवली. ‘हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल, तर गौरी आणि त्यांच्यासारखी विचारसरणी असणार्‍यांची हत्याच केली पाहिजे’, हे त्याने त्या युवकांच्या गळी उतरवले, असेही ‘एसआयटी’चे म्हणणे आहे.

काळेला 21 मे रोजी दावणगिरीमधून अटक झाली आहे. म्हैसूरचे प्रा. के. एस. भगवान यांची हत्या करण्याचा त्यांनी कट रचल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक झाली. अधिक चौकशीत त्यानेच गौरी हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले. के. टी. नवीनकुमार, सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, मनोहर दुंडाप्पा येडवे हे गौरी हत्या प्रकरणातील इतर तिघे संशयित अटकेत आहेत.

विजापुरातून आणखी चौघे ताब्यात?

सिंदगीच्या परशुराम वाघमारेला अटक केल्यानंतर विजापूर जिल्ह्यातून आणखी चौघांना ‘एसआयटी’ने ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ते चौघे परशुरामचे मित्र आहेत. परशुरामला त्यांनी मदत केली होती का, हा तपास केला जात आहे. श्रीराम सेनेच्या कार्यात परशुराम सक्रिय होता. त्यावेळी हे चौघे त्याच्यासोबतच फिरायचे, अशी माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे.