Thu, Aug 22, 2019 08:34होमपेज › Belgaon › गॅसटँकर पलटी; महामार्ग ठप्प

गॅसटँकर पलटी; महामार्ग ठप्प

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:33AMनिपाणी : प्रतिनिधी

केरळहून मुंबईकडे गॅस घेऊनजाणारा टँकर महामार्गावर तवंदी घाटात पलटी झाल्यामुळे बेळगाव-कोल्हापूर महामार्ग रात्री उशिरापर्यंत वाहतुकीसाठी बंद झाला होता. टँकर पलटी होऊन गॅस गळती झाल्यामुळे स्फोटाची शक्यता गृहित धरून पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक अडवून धरली होती. परिणामी वाहनांचा खोळंबा झाला. दोन्ही बाजूंनी सुमारे  5 कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.

प्रोपिलीन गॅसची वाहतूक करणारा टँकर पनवेल-मुंबईकडे चालला होता. तवंदी घाटातील धोकादायक दुसर्‍या वळणावर चालक रणजितसिंहचा ताबा सुटला आणि महामार्गाच्या दुभाजकावर पलटी झाला. त्यात रणजितसिंह (वय 30, रा.अमृतसर, पंजाब) व क्‍लीनर जितेंद्र वर्मा (25, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हे दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून म.गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, अपघातग्रस्त टँकर दुभाजकावरील लोखंडी संरक्षित बॅरिकेट्सवर आदळल्याने टँकरला गळती लागली  आणि काही क्षणातच गॅस प्रेशरने हवेत उडू लागला. पोलिसांना ही घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. टँकरमधून प्रेशरने बाहेर पडणारा गॅसचा उग्र वास दूरपर्यंत पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गावरून दोन्ही बाजुने होणारी वाहतूक घटनास्थळापासुन सुमारे 500 मीटर अंतरावर रोखून धरली. त्यामुळे रस्तयाच्या दुर्तफा सहा कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.

सायंकाळी 7 पर्यंत वाहतूक खोळंबल्याने प्रशासनाने पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवली. त्यानुसार बेळगावहून निपाणीकडे जाणारी वाहने संकेश्वर-चिक्कोडी-निपाणीमार्गे वळवण्यात आली. तर कोल्हापूरहून बेळगावकडे येणारी वाहनेही पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली. निपाणीचे सीपीआय किशोर भरणी, एएसआय एम.जी.निलाखे यांच्यासह 10 कर्मचारी, निपाणी अग्निशामक विभागाचे निरीक्षक ए.के.नदाफ यांनी बंबासह तसेच एन.के.एलईलचे मुख्य निरीक्षक लक्ष्मण चौगुले, पुंजलॉईडचे सेप्टी ऑफिसर रामकुमार मिश्रा, मुख्याधिकारी ई.के.किटली  भरारी पथकाचे आण्णापा खराडे,सचिन हुक्केरी आदिंनी उपाययोजना करण्यात सहकार्य केले.

संकेश्‍वर,यमकनमर्डी,काकती, पोलिसांना सीपीआय भरणी यांनी घटनेची  कल्पना  देत बेळगावहून कोल्हापुरकडे होणारी वाहतूक वळविण्याच्या सूचना दिल्या होत्या. ग्रामीण पीएसआय निंगनगौडा पाटील यांनी कोल्हापूरहुन बेळगाकडे होणारी वाहतूक कोगनोळी व आप्पाचीवाडी फाटयापासुन सुरळीत केली. रात्री उशिरा जिल्हा पो.प्रमुख सुधीरकुमार रेड्डी, उपअधीक्षक दयानंद पवार यांनीही घटनास्थळी भेट दिली.गॅस घातक नसला तरी..टँकरमधील प्रोपिलीन गॅस घातक नसला तरी पोलिस,अग्‍निशामक विभाग तसेच पूंजलॉईड कंपनीने   घटनास्थळी कडक पहारा ठेवला होता. टँकरच्या आसपासही कुणाला फिरकू देण्यात येत नव्हते. रात्री उशिरा टँकरमधील  गॅस बाहेर येत असल्याने  वाहतूक रोखून धरण्यात आली होती. यामुळे रात्री उशिरापर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्पच होती. दरम्यान, सदलगा येथील दुचाकीस्वाराने पत्नीसमवेत धाडसाने टँकरजवळ दुचाकी नेली होती. त्याला  पोलिसांनी पकडून बेदम चोप दिला.