Sun, Nov 18, 2018 17:36होमपेज › Belgaon › किल्ला तलाव उद्यान समस्यांच्या ‘गाळा’त 

किल्ला तलाव उद्यान समस्यांच्या ‘गाळा’त 

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 02 2018 9:54PMबेळगाव : प्रतिनिधी 

शहरातील प्रमुख तलाव आणि नंतर उद्यान म्हणून विकसित झालेले किल्ला तलाव उद्यान समस्यांच्या गाळात अडकले आहे.  निसर्गरम्य परिसर, विस्तीर्ण पाणी आणि आल्हाददायी वातावरण असूनही दुरुस्तीअभावी सौंदर्य झाकोळले गेले आहे. ऐतिहासिक किल्ला आणि शेजारी असणारा तलाव पर्यटन स्थळ म्हणून तीन वर्षापूर्वी विकसित करण्यात आला. सकाळी व सायंकाळी चालण्याचा व्यायाम करण्यासाठी येणार्‍यांची संख्याही मोठी असते. लहान मुलांचा मोठा वावर आहे. पण सुरुवातीला मोठा गाजावाजा करून सुरू आलेला संगीत कारंजा बंद असल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. 

तलाव काठावरील पेव्हर्स ब्लॉक काही ठिकाणी उखडले आहेत. या बाजूने मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. संरक्षक भिंतीच्या आतील बाजूने अस्वच्छता पसरली आहे. मुलांना खेळण्यासाठी असणारी आगीनगाडी, वर-खाली होणारा झोपाळा अनेक महिन्यांपासून नादुरुस्त स्थितीत आहे. यामुळे परिसरातील मुलांचा हिरमोड होत आहे. तलाव काठावर असणारा संरक्षक कठडा मोडकळीस आला आहे. या ठिकाणाहून लहान मुले तलावात पडण्याचा धोका आहे. तलावाच्या प्रवेशद्वाराला लागून असणारे कंपाऊंड स्थानिक रहिवाशांनी पाडून लागूनच असलेल्या नागरी वसतीतून थेट तलाव काठावर पायवाट केली आहे. सध्या या ठिकाणी उपलब्ध असणार्‍या बोट कमी पडत आहेत. सायंकाळी येथी बाहेरून येणार्‍या पर्यटकांना तलावात फिरण्याचा आनंद लुटण्यात आडचणी येत आहे.