Thu, Aug 22, 2019 13:03होमपेज › Belgaon › पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर गांजा

पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर गांजा

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 19 2018 8:51PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील अंमली पदार्थ व गांजा विक्री करणार्‍यांवर पोलिस प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. गेल्या महिन्याभरात पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करुन अनेक जणांना अटक केली आहे. तर गांजा ओढणार्‍यांनाही ताब्यात घेउन कावाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बेळगावचे उडता पंजाब होउ देणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री डॉ. जी.परमेश्‍वर यांनी पोलिसांना अधिक सतर्कतेचा ईशाराच दिला आहे.  मात्र पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर गांजाविक्री केली जात आहे. 

विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर सत्ताधारी व विरोधी गटामध्ये जोरदार चर्चा झाली होती. विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा मुद्दा पुढे करुन सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार्‍या पोलिसांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्‍न उपस्थित केला होता. यावरुन उपमुख्यमंत्री डॉ. जी परमेश्‍वर यांनी राज्यातील अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री करणार्‍या शहरांमध्ये बेळगावचाही नामोल्‍लेख केला होता.त्यामुळे बेळगावचे नाव चर्चेत आले होते.

नुकताच सीसीबी पोलिसांनी सापळा रचून गांजा विक्री करणार्‍यांवर केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात हा व्यवसाय तेजीत होत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आरपीडी क्रॉसवर गांजा विक्री करणार्‍यांना ताब्यात घेतले होते. तर सीसीबी पोलिसांनी बुधवारी गँगवाडी परिसरात गांजा विक्री करणार्‍यांना रंगेहात पकडले आहे. सदर गांजा विक्रीची ठिकाणे पाहिल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे प्रथमिक अंदाज व्यक्‍त केला जात आहे. 

टिळकवाडी परिसरातील केलेली कारवाईदेखील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची गर्दी असणार्‍या परिसरातच केली होती. तर गँगवाडी  परिसराच्या सभोवताली अनेक नामवंत महाविद्यालये आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्याथ्यार्र्ंना अंमली पदार्थाच्या विळख्यात ओढण्यासाठीच गांजा विक्री होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गँगवाडी भागात अनेक नामवंत टुरिस्ट कंपन्यांच्या लांबपल्ल्याच्या बसेसही ये-जा करतात. अशा ठिकाणी नियोजनबद्धरित्या अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

होण्यापासून रोखणार का...?

गँगवाडी हा परिसर जिल्हा पोलिस प्रमुख व पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. यापूर्वीही  याच भागातील सुभाषनगर येथील नागरिकांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन गांजा विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सीसीबी पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेत आली आहे.  पोलिसांनी केलेली कारवाई व उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांनी केलेले वक्तव्य बेळगावला पोलिस प्रशासन उडता पंजाब होण्यापासून रोखणार का? हे पहावे लागणार आहे.