Thu, Apr 25, 2019 13:57होमपेज › Belgaon › अबब... स्मार्टसिटीत गांजा पार्कही!

अबब... स्मार्टसिटीत गांजा पार्कही!

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 8:24PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

उद्यानातील आल्हाददायक मोकळी हवा आरोग्याला लाभदायक असते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ उद्यानामध्ये लहान-थोरांची वर्दळ असते. बेळगाव शहरात अनेक उद्याने आहेत. मात्र यामध्ये गांजा पार्कचे नाव पुढे आल्यानंतर बेळगावकर हबकून गेले आहेत. मनपा प्रशासकीय बैठकीत नगरसेवकांनी शहरातील विविध भागात चाललेल्या गर्दुल्यांच्या कारनाम्यांची माहिती दिली तर मुजम्मील डोणी यांनी खंजर गल्ली येथील गांजा पार्कची कथा सांगून गांजा प्रकरणी प्रशासनाचे पितळ उघड केले.

देशात बंगळूर शहराची ओळख गार्डन सिटी अशी होती. अलीकडच्या काही वर्षात बंगळूरला आयटी सिटी म्हणून ओळखले जात आहे.त्याचप्रमाणे बेळगाव वेणुग्रामची ओळख सांस्कृतिक शहर, शैक्षणिक हब अशी आहे. मात्र वाढत्या गुन्हेगारीने बेळगाव शहराची ओळख क्राईम सिटी अशी झाली आहे.

10 वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणानंतर बेळगावचे अंमली पदार्थ कनेक्शन आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले होते. तीन राज्यांच्या हद्दीवरील बेळगाव शहर गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनले आहे. त्यातही बेळगावपासून काही अंतरावर असलेल्या गोवा राज्यात अंमली पदार्थांची तस्करी जोरात होते.अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांना बेळगाव नजीकचे आणि मोक्याचे ठिकाण वाटते. त्यामुळेच बेळगावात अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे.

गेल्या वर्षभरात शहरात गांजाची विक्री वाढली आहे. राजरोसपणे गांजाचा धूर काढण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. शहरातील विविध पोलिस स्थानकांच्या हद्दीत गांजा विक्रीचे प्रकार वाढले आहेत. शहरातील अनेक तरुण गांजाच्या आहारी गेले असून गांजा सहज उपलब्ध होत असल्याने शाळकरी विद्यार्थीही त्याकडे वळत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. मोक्याच्या ठिकाणी, निर्जनस्थळी, काही शाळा- कॉलेज रस्त्यांवर गांजा विक्री होत आहे. त्याशिवाय काहीजण फिरून गांजाची विक्री करत आहेत. बेळगाव शहरापासून नजीक असलेली काही गावे आणि मिरज भागातूनही बेळगावला गांजा येत असल्याची नेहमी चर्चा असते.

बुधवारी मनपात झालेल्या प्रशासकीय बैठकीत मुजम्मील डोणी यांच्याबरोबरच नगरसेविका जयश्री माळगी यांनी आपल्या प्रभागातील खुल्या जागेत गर्दुल्यांचा उपद्रव वाढल्याची माहिती दिली. शहर उपनगरात अंमली पदार्थांची विक्री बंद झालेली नाही. शाळा-महाविद्यालय परिसर आणि निर्जनस्थळी होत असलेल्या गांजाविक्रीमुळे नजीकच्या काळात बेळगाव शहरात विविध ठिकाणी गांजा पार्क सुरु झाल्यास त्याचे अप्रुप राहणार नाही.