Mon, Mar 25, 2019 18:10होमपेज › Belgaon › भीमातीर पुन्हा एकदा हादरला...

भीमातीर पुन्हा एकदा हादरला...

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:24PMविजापूर : वार्ताहर

कुख्यात गुंड धर्मराज चडचण याचा भाऊ गंगाधर चडचण ( वय 30) याचा भीषण खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोन मारेकर्‍यांच्या सहाय्याने हा खून केला असून यामध्ये आणखी पोलिस अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचा संशय सीआयडी अधिकार्‍यांना आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

गंगाधर चडचण खूनप्रकरणी सध्या पीएसआय गोपाळ हळ्ळूरसह सिद्धारुढ रुगी, चंद्रशेखर जाधव, गद्याप्पा नायकोंडी या तिघा पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर हणमंत पुजारी व सिद्धगोंडाप्पा तिकोंडी यांनाही ताब्यात घेतलेले आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी दाखल झालेल्या सीआयडी अधिकार्‍यांनी हणमंत पुजारी आणि तिकोंडी यांची सोमवारी चौकशी केली. 30 ऑक्टोबर 2017 रोजी कोंकणगाव (ता. इंडी) येथे पोलिसांनी धर्मराज चडचण याची हत्या केल्यानंतर त्याचा भाऊ गंगाधर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर एका वाहनात बसलेल्या दोघां अज्ञाताकडे त्याचा ताबा दिला. त्यांनी गंगाधरचे हातपाय बांधून भीषण पद्धतीने हत्या केली. त्याच्या देहाचे तुकडे करून इंडी तालुक्यातील केरूर परिसरातील  भीमा नदीत व कूपनलिकेमध्ये फेकले. गाडीमध्ये बसलेले ते दोघे कोण, याचा तपास सीआयडी डीवायएसपी जनार्दन यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून  करण्यात येत आहे.

दरम्यान, याप्रकरणात आणखी काही पोलिसांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिस निरीक्षक एम. ए. असोडे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. असोडे चडचण पोलिस स्थानकात कार्यरत होते. त्यांची निवडणूक काळात गुलबर्गा येथे बदली झाली होती. निवडणुका पार पडल्यानंतर ते पुन्हा रुजू होणे आवश्यक होते. मात्र सध्या याठिकाणी पोलिस निरीक्षक इनामदार कार्यरत आहेत. याबाबतचा आदेेेश आयजीपी अम्रित पाल यांनी काढला आहे.  असोडे यांच्यावर अद्याप  गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र ते सध्या  संशयाच्या भोवर्‍यात सापडले असून त्यांची चौकशी सीआयडीकडून होत आहे. चडचण पोलिस स्थानकात सदर प्रकरणाची  नोंद आहे. यामध्ये महादेव सावकार भैरगोंड, हणमंत पुजारी, सिद्धगोंड तिकोंडी आदीसह सहाजणांची नावे समाविष्ट आहेत. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरितांचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी महादेव भैरगोंड फरारी असून त्याचा तपास करण्यात येत आहे.