Fri, Mar 22, 2019 00:13
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › आणखी एका पोलिस अधिकार्‍याचा हात?

आणखी एका पोलिस अधिकार्‍याचा हात?

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 11:32PMविजापूर : प्रतिनिधी

भीमातिरावरील गंगाधर चडचण हत्येप्रकरणी चौकशी केल्यानंतर सीआयडीने पोलिस उपनिरीक्षक गोपाल हळ्ळूरसह सर्व सहा संशयितांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. चौकशीत धर्मराज एन्काऊंटर आणि गंगाधर चडचण हत्येविषयी स्फोटक माहिती उघडकीस आली असून आणखी एक पोलिस अधिकार्‍याला अटक होण्याची शक्यता आहे.

धर्मराजचा एन्काऊंटर करण्यापूर्वी गंगाधरला अटक करून त्याला गुप्‍त ठिकाणी ठेवण्यात आले होते. एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या कारमधून त्याला नेण्यात आले होते. कोकणगाव येथे स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी एक पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडे गंगाधरला सोपविण्याची सूचना देण्यात आली होती. स्कॉर्पिओ कारनजीक गेल्यानंतर तेथे हणमंत पुजारी होता. त्याच्याकडे गंगाधरला सोपविण्यात आले. सर्वकाही वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनेनुसार करण्यात आल्याची माहिती अटकेतील संशयित कॉन्स्टेबलनी दिली आहे. 

या प्रकरणातील प्रमुख संशयित महादेव सावकार भैरगोंडा याच्या केरूर (ता. इंडी) येथील निवासावर छापा घालून सीआयडी पोलिसांनी रायफल, रिव्हॉल्वर आणि पिस्तुलाची सुमारे 100 जिवंत काडतुसे जप्‍त केल्याची माहिती मिळाली आहे. भैरगोंडाने आपल्या सुरक्षेसाठी नियुक्‍त केलेल्या अंगरक्षकांच्या परवानाधारक बंदुक, पिस्तुलाची ती काडतुसे असल्याचा संशय सीआयडीला आहे.

गेल्या तीन ते चार दशकांमध्ये इंडी तालुक्यात काही हत्या घडल्या आहेत. पण, त्या दोन कुटुंबांमध्ये घडल्या असून त्याचा सामान्य माणसावर कोणताच परिणाम झाला नव्हता. प्रसारमाध्यमांनी इंडी शहर आणि तालुक्याचे नाव खराब केले आहे. पोलिस, राजकारणी आणि सरकारी व्यवस्थेकडून योग्य काम होत असेल तर तालुक्यातील गुंडगिरी कधीच संपुष्टात आली असती, असे मत तालुक्यातील रहिवासी व्यक्‍त करतात. 

गंगाधर चडचण हत्या प्रकरणात पोलिस खात्यातील चौघांचा समावेश असल्याने तालुकावासीयांतून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. इंडी तालुक्यातील चडचण, उमराणी आलमेल तसेच सिंदगी तालुक्यातील देवणगाव येथे नेहमीच गुंडगिरीच्या घटना घडत असतात. त्यामुळे तेथील परिस्थितीविषयी कुणीच जास्त विचार करत नाही. 

गेल्या चाळीस वर्षांपासून या भागात वावरणार्‍यांच्या मते या हत्या प्रकरणामुळे पोलिस आणि समाजघातक शक्‍तीचे लागेबांधे उघड झाले आहेत. दोन कुटुंबांमध्ये वाद असला तरी त्यांनी सामान्यांना, इतरांना त्यासाठी कधीच वेठीस धरलेले नाही. वीस वर्षांपूर्वी हरिजन आणि भैरगोंडा कुटुंबातील काहीजणांकडून व्यापार्‍यांना त्रास देण्यात येत होता. त्यावेळी व्यापार्‍यांनी एकत्र येऊन त्यांच्याविरोधात बंद पुकारला. तत्कालिन जिल्हा पोलिसप्रमुख प्रताप रेड्डी यांनी गुन्हेगारांविरूद्ध कठोर पाऊल उचलले. त्यानंतर आतापर्यंत व्यापार्‍यांना कुणीच त्रास दिलेला नाही. काही राजकारण्यांनी आणि पोलिसांनी वैयक्‍तिक स्वार्थ साधण्यासाठी चडचणमधील कौटुंबिक वादाचा लाभ घेतला. इंडी येथे पोलिस खात्यामध्ये काम केलेल्या एका व्यक्‍तीने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा केल्यानंतर संबंधित संशयित महाराष्ट्रातील पुणे किंवा इतर ठिकाणी फरारी होत होता. तेथून तो इंडीतील कॉन्स्टेबलच्या संपर्कात रहायचा. गुन्ह्याच्या तपासासाठी नागरिक आणि प्रसारमाध्यमांचा दबाव आला की पोलिस गुन्हेगाराला अटक करत होते.

समन्वयात भाषेचा अडसर

एखाद्याने गुन्हा केला तर त्याला येथून पलायन करणे सोपे आहे. सामान्यपणे गुन्हा केल्यानंतर गँगस्टर महाराष्ट्रातील सोलापूर किंवा इतर ठिकाणी सहजपणे फरारी होतात. महाराष्ट्रातील पोलिस मराठीत संवाद साधतात. पण, भाषेची समस्या असल्याने कर्नाटक पोलिस तेथे जाण्यास टाळाटाळ करतात. केवळ आयपीएस पातळीवरील अधिकारी सोलापूरच्या पोलिस अधिकार्‍यांशी संपर्कात असतात, अशी माहिती एका पत्रकाराने दिली.