Tue, May 21, 2019 22:44होमपेज › Belgaon › गणेशपूरच्या तरुणाची ‘आयएमए’त भरारी

गणेशपूरच्या तरुणाची ‘आयएमए’त भरारी

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:07AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

मूळचा हंदिगनूर (ता. बेळगाव) व सध्या गणेशपूर येथील दीपक रामचंद्र पाटील याने जिद्दीने वयाच्या 25 व्या वर्षी इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीत (आयएमए) भरारी घेतली आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मधून त्याने पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही ट्युशन्स न लावता यश मिळविले. याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून येत्या 30 रोजी तो आसाम सीमेवर लेफ्टनंटपदी रुजू होत आहे. 

दीपकचे वडील रामचंद्र भारतीय सैन्यातून ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दीपक सैन्यदलात लेफ्टनंटपदी भरती झाला. रामचंद्र पाटील यांनी ही 1984 साली अमृतसर येथे यशस्वी पार पडलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मध्ये कामगिरी करून चुणूक दाखविली. 

दीपकचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेश येथील आर्मी पब्लिक स्कूल जलालपूर येथे झाले. नंतर बेळगाव येथील केंद्रीय विद्यालय क्र. 2 मधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. भरतेश कॉलेजमधून बीसीए तर एमसीए जैन कॉलेजमधून पूर्ण केले. एमसीए द्वितीय वर्षात असताना दीपकने बॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी केली. 2015 मध्ये हरियाणा येथील कुरुक्षेत्र युनिर्व्हसिटीमध्ये ऑल इंडिया इंटर यनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियन अंतर्गत व्हीटीयूतर्फे सहभागी होऊन मानाचा ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ किताब पटकाविला. 

एमसीए पूर्ण झाल्यानंतर काही काळ खासगी कंपनीत काम केले. घरचे वातावरण सैनिकाचे असल्याने त्याचे मन रमले नाही. कोणत्याही ट्यूशन्सशिवाय आयएमएची मनाशी खुणगाठ बांधून तयारीला लागला. एसएसबीमधून त्याची यशस्वी निवड झाली. भोपाळ येथून दीपकने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (टीजीसी) एंट्री मेरिट लिस्टमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. दीपकला  मोठी बहीण कै. डॉ. सीमा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. वडील रामचंद्र, आई कमल, लहान बहीण नीता,  निवृत्त कर्नल फर्नांडिस (जैन कॉलेज) यांचे मार्गदर्शन लाभले.