Sun, Apr 21, 2019 00:07होमपेज › Belgaon › गणेशोत्सव बनतोय खर्चिक इव्हेंट !

गणेशोत्सव बनतोय खर्चिक इव्हेंट !

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 8:18PMबेळगाव : प्रतिनिधी

राखी पौर्णिमेपासून रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मांडव घालण्याचे काम सुरू होते. गणेशभक्तांची आतुरता वाढू लागते. रस्ता अडविणारा मांडव, कानठळ्या बसविणारे संगीत, भपकेबाज रोषणाई, अवाढव्य श्रीमूर्ती यातून सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ गाभाच लुप्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या काळात काटकसरीने गणेशोत्सव साजरा करता येईल का, यावर सर्व मंडळांनी व्यापक चिंतन करण्याची गरज आहे.

श्री गणेश ही बुध्दीची देवता असेल तर तिच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहावे लागेल. लोकमान्यांच्या कल्पक बुद्धीतून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळात विधायक कार्य घडले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सामाजिक स्तरावरील आनंद सोहळा या नजरेने उत्सवाकडे पाहिले जात असे. मात्र पंचवीस वर्षात सार्वजनिक गणेशोत्सवाची दिशाच बदलली. सार्वजनिक गणेशोत्सवाकडे आता ईव्हेंटच्या नजरेने पाहिले जाते. एकोप्याच्या सणाने आता स्पर्धेचे रुप घेतले आहे. जे मंडळ अवाढव्य खर्च करेल. त्या मंडळाच्या राजाचा मान मोठा असा जमाना आहे.

महागाईचा कळस वाढतच असतो. व्यापार- उद्योगातील चढउतार सुरूच असतात. बेरोजगारीच्या संख्येचा वाढता आलेख कायम राहतो. समाजासमोरील विविध प्रकारचे प्रश्‍न टिकून आहेत. पर्यावरणाची हानी उघड्या डोळ्यांनी पहावी लागत आहे. वाढत्या प्रदूषण आणि अस्वच्छतेने नागरिकांचे आरोग्य बेहाल होत आहे. शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. या सार्‍या मुद्यांची झळ प्रत्येकालाच कुठे ना कुठे पोहोचत आहे. तरीही गणेशोत्सवावर अवाढव्य खर्च केला जात आहे.

बेळगावात भव्य श्रीमूर्ती विसर्जनासाठी योग्य तलाव नसतानाही मूर्तीची उंची वाढविण्याचा अट्टहास सुरू आहे. छोट्या सुबक मूर्तीची ओढ असायला हवी. वर्षभर भारनियमनाच्या नावाने गळा काढला जातो. मात्र याच उत्सवासाठी डोळे दीपवणार्‍या भपकेबाजी रोषणाईतून विजेचा मोठा अपव्यय होत असतो. याची कुणाला काळजी नाही. याबाबत विचार होणे आवश्यक आहे. 

उत्सवादरम्यान ध्वनी आणि वायू प्रदूषणाची पातळी कमालीची वाढते. कर्णकर्कश संगीत, छातीला हादरे देणारा डॉल्बीचा आवाज आणि या घातक आवाजावर केला जाणारा अवाढव्य खर्च चिंतेचा विषय आहे. काही मंडळांच्या मूर्तीच्या किमतीच्या तिप्पट खर्च डॉल्बीवर होतो. त्यावेळी मंडळाच्या बुद्धीची कीव येते. मिरवणुकीत परिसरातील तरुणांना पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यासाठी प्रवृत्त केल्यास ही बुद्धीदेवतेची आराधना होईल. उत्सवादरम्यान होणारी फटाक्यांची आतषबाजी अनेक आजारांना कारण देणारी आहे. उत्सवादरम्यान काही मंडळांत फटाक्यांच्या आतषबाजीवरून चढाओढ लागलेली दिसते. याच्या घातक परिणामांचे सोयरसुतक अनेकांना दिसत नाही. 

अलिकडे महाप्रसादाचे प्रस्थ वाढले आहे. उत्सवादरम्यान गल्लोगली महाप्रसाद होतात. महाप्रसादाचा बोजा व्यापारी, उद्योजकांवर टाकला जात आहे. अन्नदान श्रेष्ठ दान म्हटले जाते. मात्र उत्सवाच्या महाप्रसादातून पोट भरलेल्यांनाच तो देण्याचा खटाटोप सुरू असतो. महाप्रसादावर किमान 60 ते 70 हजार रुपये खर्च होतात. याच खर्चातून प्रत्येक वर्षी मंडळाने नियोजनबद्धरित्या विधायक उपक्रमांचा संकल्प तडीस नेल्यास बुद्धीदेवता प्रसन्न होईल.