Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Belgaon › निधी, योग्य नियोजनाअभावी विकास खुंटला

निधी, योग्य नियोजनाअभावी विकास खुंटला

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 29 2018 8:41PMबेळगाव : प्रतिनिधी

महापालिकेतर्फे निधी व योग्य नियोजनाअभावी वॉर्ड 10 ला समस्यांनी ग्रासले आहे. ड्रेनेज, पिण्याचे पाणी, विहिरीला दूषित पाणी, धोकादायक उच्च दाब वीज वाहिनी, पथदीप, रस्ते आदी प्रमुख समस्या आहेत. नगरसेवकांचे दर्शनही वॉर्डात क्वचितच होते. वॉर्डची लोकसंख्या 6 हजारपेक्षा अधिक आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वॉर्डाचा विकास करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. 

महापालिकेतर्फे 24 तास पाणी योजना राबविण्यात आली असली तरी  वॉर्डात 4 ते 5 दिवसांतून एकदा पाणी येते. यामुळे नागरिक परसातील विहिरीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. ठिकठिकाणी सांडपाण्याची समस्या असल्याने त्याचा निचरा न होता ते जमिनीत झिपरत असल्यामुळे  भागातील विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. कूपनलिकेची हीच अवस्था आहे. या भागातील पाण्याची टाकीदेखील वेळेवर स्वच्छ केली जात नाही. 

2013 साली महापालिकेच्या   निवडणुकीवेळी या भागातील नगरसेवकाने अनेक घोषणा दिल्या होत्या. मात्र त्या पूर्ण झाल्या नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. वॉर्डातील लोकांना शासकीय योजना पुरविल्या जातील, मराठी मतदारांना मराठीतून कागदपत्रे, घरे बांधणे, गॅस आदी योजनांबद्दल माहितीही दिली जात नाही. निधी व योग्य नियोजन झाले नसल्याने भागाचा विकास खुंटला आहे. इतर वॉर्डापेक्षा हा भाग समस्यांनी ग्रासल्याच्या तिखट प्रतिक्रिया रहिवाशांनी दिल्या.  

या वॉर्डात एकही गार्डन नाही. यामुळे गार्डन उभारण्याची मागणी होत आहे. नगरसेवक या भागात फिरकत नाहीत, यामुळे लोक नगरसेवकाच्या घरी जाऊन समस्या सांगतात. तरीही त्यांचे दुर्लक्ष होते, अशी माहिती मिळाली. रणझुंझार कॉलनीतील जुनी ड्रेनेज लाईन बदलणे गरजेचे आहे. संभाजीनगरातील बस स्टॉप जुनाआहे. त्या आवारात हायमास्ट दिवे बसविणे, बाळकृष्णनगरात रस्ते, गटारी निर्माण करणे. शिवगणेश कॉलनी यरमाळ रोड येथे कूपनलिका बसविणे. डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंध आणण्यासाठी योग्य उपाययोजना आखणे. चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी योजना आखण्याची गरज येथील रहिशांनी व्यक्त केली.

वॉर्डात राबविलेली विकासकामे 

वॉर्ड 10 मध्ये आतापर्यंत एक कोटीची कामे राबविली आहेत. यामध्ये रस्त्यांसाठी 40 लाख, गटारींसाठी 40 लाख व वड्डर छावणीत समुदाय भवन उभारणीसाठी 20 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.  

विहिरीचे पाणी दूषित 

ड्रेनेज समस्या चिंताजनक आहे. ड्रेनेज तुंबून विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. यामुळे केशनवनगर, संभाजीनगर भागातील विहिरीचे पाणी खराब झाले आहे. 12 महिने समस्या येते. मनपाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. पिण्याचे पाणी 24 तास नसल्याने लोकांना विहिरीवर अवलंबून राहावे लागते. यासाठी 24 तास पाणी पुरवण्याची मागणी होत आहे.