Thu, Apr 25, 2019 22:00होमपेज › Belgaon › इंधन दरवाढीची झळ...

इंधन दरवाढीची झळ...

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 10:41PMबेळगाव : प्रतिनिधी

इंधन दरवाढीमुळे खासगी बसेसच्या चालकांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. मिळणारा महसूल आणि इंधन तसेच अन्य बाबींवर होणारा खर्च याचा ताळमेळ बसविताना या चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. 

ऐन सुट्ट्यांच्या आणि कमाईच्या हंगामात सातत्याने झालेल्या दरवाढीमुळे बजेट कोलमडले आहे. शहरात रामदेव हॉटेल, सन्मान हॉटेल, काँग्रेस रोड, गोवावेस या महत्त्वाच्या भागातून खासगी बसचालकांच्यावतीने काही वर्षापासून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये म्हैसूर, बंगळूर, हुबळी, धारवाड, परराज्यातील पुणे, मुंबई कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आदी ठिकाणी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
शहरातून तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक आहे. इंधन दरवाढ झाली असली तरी यांच्याकडून अजूनही तिकिटात दरवाढ करण्यात आलेली नाही. सरकारी बसेसचे तिकिटाचे दर वाढविण्यात आल्यानंतर आम्ही दरवाढ करणार आहोत, अशी माहिती खासगी बस वाहतूकदारांनी दिली. शहरातून पूर्व, पश्‍चिम भाग व खानापूर तालुक्यात खासगी वाहतूक केली जाते.

खासगी बसेस आरामदायी आणि एसटी महामंडळाच्या तुलनेत जलद असल्याने गेल्या काही वर्षांत प्रवाशांनी या बसेसला चांगलीच पसंती दिली आहे. उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीत हंगाम असतो. यावेळी दरवाढ केली जाते. त्यामुळे त्यांची  चांगलीच कमाई होत असते. मागील काही दिवसात डिझेलच्या दरात रोज वाढ झाली. यामुळे मिळत असलेला महसूल आणि  होणारा खर्च यामध्ये कमालीची तफावत आहे. परिणामी चालकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.