Sat, Aug 24, 2019 12:25होमपेज › Belgaon › आरटीई प्रवेश १५ पासून; शिक्षण खात्याचे शाळानिहाय मॅपिंग पूर्ण

आरटीई प्रवेश १५ पासून; शिक्षण खात्याचे शाळानिहाय मॅपिंग पूर्ण

Published On: Feb 12 2019 1:05AM | Last Updated: Feb 11 2019 11:57PM
बेळागाव : प्रतिनिधी

2019-20 च्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गंत (आरटीई) प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. सदर प्रक्रिया एक महिना उशिरा झाली असून, पालकांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे. गतवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला होता.  यंदापासून आरटीईमध्ये कमी उत्पन्‍न असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या मुलांचाही समावेश केला आहे.

खासगी शाळेत आरटीई अंतर्गत एलकेजी व पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. एलकेजीसाठी मुलाचे वय 3 वर्षे 10 महिने ते 4 वर्षे 10 महिने या दरम्यान असावे. म्हणजे सदर बालकाचा 01-08-2014 ते 1-08-2015 या वर्षातील महिन्यात जन्म झालेला असावा.

पहिलीसाठी बालकाचे वय 5 वर्षे 10 महिने ते 6 वर्षे 10 महिने पूर्ण असले पाहिजेत. म्हणजे सदर बालकाचा 01-08-2012 ते  01-08-2013 या दरम्यान जन्म झालेला असावा. आतापर्यंत सरकारी कर्मचार्‍यांच्या मुलांना आरटीई कायदा लागू नव्हता. परंतु, यंदापासून शिक्षण खात्याने सरकारी कर्मचारी असलेल्या पालकांनाही आरटीईसाठी अर्ज भरता येणार आहे. शिक्षण खात्याने अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था केली आहे. 15 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. गतवर्षी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणींना पालकांना सामोरे जावे लागले होते. अर्ज भरताना अनेक अडचणी आल्या होत्या. सदर अर्ज एक कि. मी. अंतरातील वॉर्ड क्रमांकाच्या अखत्यारित असलेल्या खासगी शाळांतून अर्ज करता येणार आहे. अर्ज भरताना आधारकार्डवर मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

आरटीई कायद्यात बदल

सरकारी शाळेतील पटसंख्येत घट होत आहे. त्यामुळे आरटीई कायद्यात बदल केला आहे. 30 जानेवारी 2019 सरकारने परिपत्रक जारी केले होते. त्यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळा असलेल्या 1 कि. मी. परिसरात खासगी विनाअनुदानित शाळा असेल तर तेथे आरटीईचा नियम लागू होणार नाही. त्याचे पालन होणार का? हे पाहवे लागणार आहे.

ग्रामीण व महापालिका हद्दीतील प्रत्येक सरकारी, अनुदानीत व  विनानुदानीत शाळांचे मॅपिंग अंतिम टप्प्यात आहे. सदरचा विभाग, त्या विभागात येणार्‍या तिन्ही प्रकारच्या शाळा याचे गणित जुळवून आरटीई प्रवेश प्रक्रीया राबविली जाणार आहे. याचे सर्व मॅपिंग तयार झाले असून, 15 फेब्रुवारीपासून ऑनलाईन आरटीई प्रवेश खुले होण्याची शक्यता आहे.
ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी, बेळगाव


आरटीईसाठी कागदपत्रे
   * विद्यार्थ्याचा जन्म दाखला
   * विद्यार्थ्याचे आधार कार्ड
   * आई-वडिलांचे जात प्रमाणपत्र
   * आई-वडिलांचे आधारकार्ड
   * उत्पन्‍न दाखला


ही आहे वेबसाईट  www.schooleducation.kar.nic.in  या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे. अधिकृत घोषणा होणे बाकी...