होमपेज › Belgaon › ग्रा. पं. कर वसुलीसाठी ‘मित्र’ सॉफ्टवेअर

ग्रा. पं. कर वसुलीसाठी ‘मित्र’ सॉफ्टवेअर

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 29 2018 11:58PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील ग्राम पंचायतींची कर वसूल करण्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यावर बेळगाव जिल्हा पंचायतीने उपाय शोधला असून त्याकरिता पहिल्यांदाच ‘कर मित्र’ नावाचे सॉफ्टवेअर बनविले आहे. याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करताना परिणामकारक कर वसुली झाल्याचे दिसून आले आहे.

विविध प्रकारचे कर हाच ग्राम पंचायतींचे मुख्य आर्थिक स्रोत आहे. पण, महसूल वसुलीच्बा बाबतीत ग्राम पंचायती नेहमीच मागे राहतात. वसुलीचे प्रमाण केवळ 25 टक्के आहे. कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगावला ओळखले जाते. पण, येथे पाणी पट्टी, मालमत्ता कर वसूल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.त्यासाठीच सॉफ्टवेअर तयार करण्यात आले.

सॉफ्टवेअरमुळे सर्व पंचायतींना कर वसुलीची माहिती ऑनलाईन द्यावी लागणार आहे. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना किंवा तालुका पंचायत कार्यकारी अधिकार्‍यांना आपल्या कार्यालयात बसून याबाबतची माहिती घेता येणार आहे. कोणत्याही वेळी विकास आढावा घेता येणार आहे. दररोज वसूल होणार्‍या महसुलाची माहिती घेऊन दर महिन्याला महसूल वसुलीचे उद्दिष्ट पंचायतींना देता येणार आहे. विधानसभा निवडणूक काळात सॉफ्टवेअर कार्यरत झाले. गुगल शिटमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींनी महसूल वसुलीची माहिती दिली. केवळ तीन महिन्यांत 6 कोटी रुपये वसुली झघली. राज्यात 6027 ग्राम पंचायती आहेत. या सर्व पंचायतींमध्ये योग्यरित्या सॉफ्टवेअर कार्यरत झाले तर कोट्यवधींचे अनुदान स्थानिक पातळीवर मंजूर केला जाणार आहे.

जिल्हा पंचायतीच्या जी-मेल आयडेंटिटीद्वारे गुगल सॉफ्टवेअरचे एक्सेल शीट ओपन करावे लागते. प्रत्येक खात्यासाठी किंवा सदस्यासाठी वेगवेगळे पासवर्ड देण्यात आले आहे. यामध्ये दररोज वसूल केलेल्या कर रकमेची माहिती द्यावी लागते. या सॉफ्टवेअरमध्ये इतर पंचायतींची माहिती पाहता येते. पण, त्यामध्ये बदल करता येत नाही. केवळ आपल्या पंचायतीची माहिती संबंधित खातेधारकाला बदलता येते. या प्रयोगामुळे महसूल वसुलीत आवश्यक सुधारणा झाली आहे. 

जिल्ह्यामध्ये एकूण 506 ग्राम पंचायती आहेत. पाणी पट्टीसह विविध प्रकारचा 51.87 कोटींचा कर भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षी केवळ 7 टक्के उद्दिष्टपूर्ती झाली. ती थकबाकी आणि यावर्षीची कर रक्‍कम मिळून 72 कोटी रुपये मालमत्ता कर, पाणीपट्टी 34.73 कोटी रुपये असे एकूण 106 कोटी रुपये वसूल करावयाचे आहेत. 

बहुतेक ग्राम पंचायतींमध्ये कर वसुली कमी होत आहे. याकरिता नवे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. कोणत्याही पंचायतीची महसूल वसुलीची माहिती सर्वांनाच मिळणार असल्याने वसुलीत सुधारणा होत आहे. - आर. रामचंद्रन, सीईओ, जि. पं. बेळगाव