होमपेज › Belgaon › ४० हजार विद्यार्थ्यांना मोफत सहल

४० हजार विद्यार्थ्यांना मोफत सहल

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:42PMबंगळूर : प्रतिनिधी

आठवी ते दहावीतील 40 हजार विद्यार्थ्यांना यंदा मोफत सहलीचा लाभ घेता येणार आहे. याकरिता 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीतील 30 हजार विद्यार्थी तसेच स्काऊट आणि गाईडमधील 10 हजार विद्यार्थ्यांना कर्नाटक दर्शन सहलीला नेण्यात येणार आहे. कर्नाटकातील विविध प्रेक्षणीय, ऐतिहासिक स्थळे विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहेत. ही सहल मोफत असून सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता निधी मंजूर केला जाणार आहे. 

याआधी काँग्रेस सरकार अस्तित्वात असताना समाजकल्याण खात्यातर्फे सहलीचे आयोजन केले जात होते. केवळ अनुसूचित जाती आणि जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत सहलीचा लाभ मिळत होता. आता पर्यटन खात्याकडे ही जबाबादारी सोपविण्यात आली आहे. यंदा सर्वच जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना मोफत सहलीला नेण्याची योजना आखण्यात आली आहे. गतवेळी केवळ एससी एसटी विद्यार्थ्यांना योजना लागू असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी सर्वच पक्षातील आमदारांनी योजनेला विरोध केला. त्यानंतर आदेशात बदल करून सर्वच विद्यार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यात आले. 

यंदाही केवळ एससी एसटीच नव्हे तर स्काऊट आणि गाइडमध्ये असणार्‍या सर्वच जाती, धर्मातील आणि गरीब विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याचे ठरविण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या राहण्या-जेवण्यासाठी सुमारे 3,500 रुपये खर्च येतो. प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे 1200 विद्यार्थ्यांची निविडण्यात येणार आहे. एकूण 40 हजार विद्यार्थ्यांसाठी 12 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गतवेळी या योजनेसाठी 3.15 कोटी रु. मंजूर करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यातून 300 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 10 हजारजणांना याचा लाभ मिळाला होता.