Sun, Jul 21, 2019 11:59होमपेज › Belgaon › गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्‍त करा

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्‍त करा

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMबेळगाव : प्रतिनिधी

शहर परिसरातील रस्ते गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर खड्डेमुक्‍त करा, अशी मागणी शुक्रवारी मध्यवर्ती गणशोत्सव महामंडळ, शहापूर विभागाच्यावतीने महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी उपमहापौर मंजूश्री पुजारी उपस्थित होत्या. शिष्टमंडळाचे नेतृत्व महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले. 

बेळगाव शहर आणि शहापूर विभागात रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजवण्यात यावेत, बंद पडलेले रस्त्यावरील दिवे, हायमास्ट दुरुस्त करण्यात यावेत, मिरवणूक मार्गात अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्या व वायरिंग हटवावे, शहापूर, खासबाग, वडगाव भारतनगर, जुने बेळगाव आदीसाठी पोलिस, महापालिका, हेस्कॉम आदी परवान्यासाठी शहापूर भागात स्वतंत्र एक खिडकी सुरु करण्यात यावी, गणपती विसर्जनापूर्वी कपिलेश्‍वर तलाव, कलमेश्‍वर तलाव, जुने बेळगाव, जक्‍कीनहोंडा, वडगाव आदी ठिकाणी स्वच्छता ठेवावी, देखावे पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे तयार करण्यात यावीत, गणेशाचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी येथील महापालिकेच्या जागेत नवीन तलाव बांधण्यात यावा, प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळास पाच हजार रुपये देण्याच्या घोषणेची पूर्तता करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

यावेळी रमेश सोंटक्की, अशोक चिंडक, रावबहाद्दूर कदम, शंकरराव बाबरी, अलहाद केकीेर, हिरालाल चव्हाण, राजकुमार बोकडे, श्रीधर जाधव, नितीन जाधव, दिपक वागळे, प्रदीप शट्टीबाचे, नितीन खलुकर आदी उपस्थित होते. प्रदूषणाचा प्रश्‍नच नाही

यावेळी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना बेळगावात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे प्रदूषण होण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नसल्याचे सांगितले. गेल्या चार वर्षापासून बेळगाव परिसरात महापालिकेकडून कुंड्या उभारण्यात आल्या आहेत यामध्ये मूर्तीचे विसर्जन केले जाते. बेळग़ावात अपवाद वगळता कोठेही विहिरीत किंवा  नदीमध्ये मूर्ती विसर्जित केले जात नाही. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्‍न निर्माण होत नाही, असा दावा कार्यकर्त्यांनी केला. याबाबत महापालिकेने जिल्हा प्रशासन आणि पोलिसंच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, अशी मागणी केली. याबाबत महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. त्याचबरोबर शहरातील खड्डे बुजवण्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येईल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले.