Tue, Mar 26, 2019 11:59होमपेज › Belgaon › स्थायी समितीवर मराठी सत्तेचा मार्ग मोकळा

स्थायी समितीवर मराठी सत्तेचा मार्ग मोकळा

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:26AMबेळगाव : प्रतिनिधी

महापालिकेच्या चारही समित्यांची निवड  बिनविरोध झाली असून, आता समित्यांवर मराठी गटाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वेळेप्रमाणे मराठी सदस्यांनी मतभेद टाळले, तर चारही समित्यांची अध्यक्षपदे मराठी गटाकडे राहतील. मनपाच्या कर व अर्थ, आरोग्य, शिक्षण व सामाजिक न्याय, नगरयोजना व विकास आणि लेखापाल या चारही स्थायी समित्यांवर प्रत्येकी सात सदस्यांची निवड बिनविरोध झाली. मात्र मराठी गटाने मनात आणले असते तर कन्‍नड गटाचा एक सदस्य लेखा स्थायी समितीपासून दूर राहिला असता; मात्र मराठी गटाने मौन पाळले. 

लेखा स्थायी समिती सदस्यपदासाठी शांता उप्पार यांच्या अर्जावर रमेश कळसण्णावर यांनी सूचक म्हणून सही केली होती; मात्र कळसण्णावर यांनी आणखी एका उमेदवाराच्या अर्जावरही सूचक म्हणून सही केली होती. एक नगरसेवक दोन सदस्यांना सूचक राहू शकत नाही. हा नियम मनपाच्या एका चलाख अधिकार्‍याच्या लक्षात येताच त्याने गुपचूपपणे शांता उप्पारांकडून दुसरा अर्ज भरून घेतला व त्यावर नगरसेवक रमेश सोंटक्‍की यांची सही घेतली. तथापि, हा अर्ज  उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेल्यानंतर भरून घेतल्याचे सत्ताधारी गटातील काही नगरसेविकांच्या लक्षात  आले.  पण, त्याबद्दल त्यांनीही सभागृहात तक्रार केली नसल्याने उप्पार यांचा दुसरा अर्ज निवडणूक अधिकारी मेघण्णावर यांनी स्वीकृत केल्याचे जाहीर केले.