Thu, Jun 20, 2019 01:13होमपेज › Belgaon › आता आरटीईअंतर्गत मुलांना मोफत पुस्तके

आता आरटीईअंतर्गत मुलांना मोफत पुस्तके

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 01 2018 7:57PMबेळगाव : प्रतिनिधी

आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके मोफत देण्याचा अद्यादेश काढण्यात आला आहे. शाळा सुरु होऊन तीन दिवस उलटले तरी कानडी व इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त मराठी व उदर्र्र्ू माध्यमाला अद्याप पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची फी शासनातर्फे भरली जात आहे. आता मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतल्याने  जिल्ह्यातील 4,907 मुलांना यंदा लाभ मिळणार आहे.  

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकवर्गानी प्रयत्न केले. जिल्ह्यात 4,907 जागांसाठी 6,927 अर्ज आले आहेत. आरटीईची दुसरी यादी जाहीर झाली असून तिसर्‍या यादीच्या प्रतीक्षेत पालक आहेत. दरवर्षी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची फी शासन भरत आले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा भार सरकारी तिजोरीवर पडला आहे. आता या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मिळण्याची तरतूद शासन करत आहे. 25 टक्के राखीव जागेसाठी नियोजित जागेपेक्षा अधिक अर्ज आले तर लॉटरी पध्दतीने प्रवेश देण्याचा निर्णय खासगी शाळांनी घेतला आहे. 

दरवर्षी शक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज जानेवारीमध्ये मागविण्यात येतात. यंदा ही प्रक्रिया फेब्रुवारीत सुरु झाली. खासगी शाळेत 25 टक्के राखीव जागेवर (आरटीई) अंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्राची जुळणी पालकवर्गाने केली. कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा, याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे अर्जसुध्दा केला. यंदा ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविल्याने बहुतेक पालकांच्या मुलांना प्रवेश मिळाला आहे. यासंबंधीचे संदेश अर्ज केलेल्या पालकांच्या मोबाईलवर आले आहेत. 28 एप्रिलला पहिली यादी तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी प्रवेश यादी जाहीर झाली. शाळेच्या फी बरोबर पाठ्यपुस्तके मिळाल्यास पालकवर्गाचा अर्थिक खर्च वाचणार आहे. त्या मुलांना मोफत गणवेश देखील देण्याचा विचार शासनाने चालविला आहे.

15 जून डेडलाईन

मराठी व उर्दू माध्यमाच्या मुलांना 15 जूनपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके मिळण्याची डेडलाईन कर्नाटक प्रिंटिंग प्रेस बंगळूर यांनी दिली आहे. त्याप्रमाणे छपाई चालू आहे. सुरुवातीला कन्नड त्यानंतर इंग्रजी माध्यमाची पाठ्यपुस्तके प्रिटिंगचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पाठ्यपुस्तके वेळेत छपाई करता आली नाही. आचारसंहिता असल्याने पाठ्यपुस्तकाच्या कामासाठी असलेला शिक्षकवर्ग निवडणूक कामात व्यस्त होता, असे कारण शिक्षक संयोजकांकडून देण्यात येत आहे.