Sun, May 26, 2019 17:09होमपेज › Belgaon › चारही मनपा समित्या बिनविरोध

चारही मनपा समित्या बिनविरोध

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:19AMबेळगाव: प्रतिनिधी

मनपाच्या कर व अर्थ, आरोग्य, शिक्षण व सामाजिक न्याय, नगरयोजना व विकास आणि लेखापाल या चारही स्थायी समित्यांवर मराठी गटातील सर्वच नगरसेवकांनी एकजूट दाखवून चारही स्थायी समित्यांची सत्ता काबीज केली.चारही स्थायी समित्यांवर प्रत्येकी 7 सभासदांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी व प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांनी जाहीर केले. गेल्यावर्षी मराठी गटातील हेव्यादाव्यांमुळे तीन स्थायी समित्यांची सत्ता विरोधी गटाकडे गेली होती.   मनपा सभागृहात मराठी गटाचे एकूण 32 इतकी सदस्य संख्या असूनदेखील तीन स्थायी समित्यांची सत्ता गमविल्यामुळे मराठी गटाची नाचक्की झाली होती. 

परंतु यावेळी गटनेते संजय शिंदे व उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी सर्वच मराठी गटाच्या नगरसेवकांना एकत्र आणण्यामध्ये यश मिळविले व चारही स्थायी समित्यांची निवड बिनविरोध घडवून आणली. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सत्ताधारी मराठी गटाला सहकार्य केल्यामुळेच ही बिनविरोध निवड होऊ शकली, अशी प्रतिक्रिया मराठी गटनेते शिंदे यांनी निवडणुकीनंतर दिली. निवडणूक प्रक्रियेला सोमवारी दुपारी 1.15 वा. प्रारंभ झाला.  निवडणुकीसाठी मनपा सभागृहामध्ये 58 नगरसेवक उपस्थित होते. 

कर, आरोग्य आणि नगरविकास या तीन समित्यांसाठी प्रत्येकी सातच अर्ज आले. त्यामुळे त्या समितीच्या सदस्यांची तत्काळ बिनविरोध निवड जाहीर झाली.लेखा स्थायी समितीसाठी संजय सव्वाशेरी, शांता उप्पार यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उप्पार यांच्या एका अर्जावर सूचक म्हणून रमेश कळसण्णावर यांनी सही केली होती. त्यांनी त्याआधीही एका सदस्यासाठी सूचक म्हणून सही केली होती. त्यामुळे निवडणूक अधिकारी मेघण्णावर यांनी त्यांचा एक अर्ज फेटाळून लावला. परंतु दुसरा अर्ज स्वीकृत केल्याने शांता उप्पार यांचा बचाव झाला. चारही समित्या बिनविरोध झाल्यामुळे नगरसेवकांनी टेबल वाजवून आनंद व्यक्त केला.  

काही सदस्य नाराज

निवडणुकीपूर्वी मराठी गटाने  बैठका घेऊन ज्यांना सत्तेची कोणतीच पदे मिळाली नाहीत, त्यांना पदे देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तीन नगरसेविकांनी पाचव्यांदा आपली वर्णी सदस्य म्हणून लावून घेतल्याने सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी त्यांच्या त्या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली

अध्यक्षांची निवड लवकरच

स्थायी समित्यांच्या बिनविरोध निवडीनंतर येत्या काही दिवसांमध्ये महापौर बसाप्पा चिक्कलदिनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचेही मराठी गटाच्या सूत्रान्वये सांगण्यात आले.