Mon, Apr 22, 2019 22:27होमपेज › Belgaon › एका गावातील चक्‍क चार विहिरी बेपत्ता

एका गावातील चक्‍क चार विहिरी बेपत्ता

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 25 2018 1:46AMबेळगाव : प्रतिनिधी

रोजगार हमी योजनेतंर्गत खोदण्यात आलेल्या एका गावातील चार विहिरी गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोषी असणार्‍या तिघांवर कारवाई करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. 

जैनापूर (ता. चिकोडी) ग्रा. पं. कार्यक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. रोजगार हमी योजनेतून विहीर खोदाईला मंजुरी मिळविण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात विहिरीऐवजी खडीच्या खाणीचा खड्डा दाखविण्यात आला. यातून पैसे हडप केले आहेत .

जैनापूर आणि तोरणहळळी येथे रोजगार हमी योजनेतून तीन वर्षापूर्वी 21 विहिरी खोदण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष पाहणीच्यावेळी चार विहिरी गायब असल्याचा प्रकार आढळला. यामुळे ग्रा. पं. अध्यक्ष, संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. त्याचबरोबर संबंधितांकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत. 

जैनापूर येथे 2015-16 साली रोजगार हमी योजनेतून लाभार्थ्यांना विहिरी खोदण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार अण्णाप्पा चलवादी यांनी जि. पं. ओंबुडसमन ए. जे. धुमाळे यांच्याकडे केली. त्यानुसार भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली. यामध्ये सदर भ्रष्टाचार उघडकीस आला.

विहिरींची पाहणी करताना त्यापैकी केवळ 17 विहिरी अस्तित्वात असल्याचे आढळून आले. उर्वरित चार विहिरींच्या नावावर खडीच्या खाणीसाठी खोदण्यात आलेले खड्डे व शेततळी दाखविण्यात आली. 
ग्रा. पं. ने लाभार्थ्यांना एकूण 1.55 लाख रु. अदा केले आहेत. मात्र विहिरीची खोदाई करण्यात आलेली नाही. यामुळे अर्धी रक्‍कम 77 हजार वसूल करण्याचे आदेश ओंबुडसमन यांनी दिले आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष, पीडीओ आणि तीन अभियंत्यांवर कारवाई करण्याची शिफारस जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी व योजनाधिकारी यांच्याकडे केली  आहे.