Wed, Sep 18, 2019 21:13होमपेज › Belgaon › कपिलेश्‍वर पुजार्‍यासह चौघांना अटक

कपिलेश्‍वर पुजार्‍यासह चौघांना अटक

Published On: May 30 2018 2:15AM | Last Updated: May 30 2018 12:21AMबेळगाव : प्रतिनिधी  

शहरातील प्रसिद्ध कपिलेश्वर  मंदिरातील पुजार्‍याच्या मुलाकडून झालेला गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्याच्या रोषातून पुजार्‍याच्या नातेवाईकांनी युवकावर अ‍ॅसिडहल्ला केला. यामध्ये प्रथमेश (23) रा. भवानीनगर जखमी झाला. या प्रकरणी पुजार्‍याच्या कुटुंबातील चौघांवर खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रामा गोपाळ पुजारी (45), महादेवी ऊर्फ माधवी गोपाळ पुजारी (35) दोघेही राहणार कपिलेश्वर रोड, लता अनिल डवरी (45) रा. महाद्वार रोड, गीता गजानन भोसले (50) रा. तांगडी गल्ली यांचा समावेश आहे. 

मंदिरातील पुजार्‍याच्या मुलाकडूनच गैरप्रकार केले जात असल्याचे नागरिकांनी उघडकीस आणले होते. याची तक्रार नागरिकांनी मंदिर ट्रस्टींकडे केली होती. सीसीटीव्ही फुटेजही सादर केले होते. यावरून ट्रस्टींनी बैठक बोलावून नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला. तसेच खडेबाजार पोलिसांना कळवून पुढील ट्रस्टींची नेमणूक होईपर्यंत दोन्ही पुजार्‍यांवर मंदिरातील पूजेस निर्बंध घालावेत, अशी मागणी केली होती.  यावरून पुजार्‍यांच्या कुटुंबियांनी काही जणांबाबत शिवीगाळ केली. सोमवार 28 रोजी रात्री दहाच्या दरम्यान पुजार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रथमेशवर अ‍ॅसिड हल्ला करून शिवीगाळ केली. 

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पुजार्‍यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढविला. पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.