Sun, Aug 25, 2019 00:22होमपेज › Belgaon › चार मुख्यमंत्री पण एकाचीही कारकीर्द पूर्ण नाही: 1956 पासूनची परंपरा

शिमोगा जिल्ह्याचे दुर्दैव कायम!

Published On: May 21 2018 1:13AM | Last Updated: May 20 2018 9:00PMशिमोगा : प्रतिनिधी

कर्नाटकाच्या राजकारणात शिमोगा जिल्ह्याला वेगळे महत्त्व आहे. येथून चार मुख्यमंत्री झाले. पण दुर्दैवाने एकाचीही कारकीर्द पूर्ण झाली नाही. यात चौथा क्रमांक आहे तो बी. एस. येडियुराप्पा यांचा.

दोन दिवसाचे येडियुराप्पा यांचे भाजपचे सरकार कोसळले. यामुळे शिमोग्याच्या या लौकिकाला छेद मिळाला नाही. यापूर्वी कडीदाळ मंजाप्पा, जे. एच. पटेल आणि एस. बंगारप्पा यांच्या बाबतीतही असेच घडले होते. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. येडियुराप्पा यांनीही तीनवेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यांनाही कार्यकाळ पूर्ण करण्यात अपशय आले. तिसर्‍या वेळी तर ते केवळ दोन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. 

2004 मध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्यांना 89 जागा मिळाल्या. काँग्रेसला 65 तर निजदला 58. निजद आणि भाजपमध्ये झालेल्या करारानुसार ही युती सत्तेवर आली. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती पहिल्यांदा. परंतु त्यांची ही कारकीर्द केवळ 7 दिवसांची राहिली. कारण निजदने आपला पाठिंबा काढून घेतला. विधानसभा बरखास्त होऊन कर्नाटक पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले. यावेळी 2008 मध्ये भाजपला 110 जागा मिळाल्या. त्यांना तीन आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. येडियुराप्पा मुख्यमंत्री झाले. भाजपचा हा दक्षिण विजय मानला गेला. येडियुराप्पांना अपक्षांचा पाठिंबा मिळाला. परंतु तीन वर्षांनी त्यांना पायउतार व्हावे लागले. कारण ते लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडले. 

1956 मध्ये त्यावेळचे म्हैसूर राज्य. कडीदाळ मुख्यमंत्री बनले. यानंतर चन्ननगिरीचे आमदार जे. एच. पाटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली ती 31 मे 1996 रोजी. नंतर एच. डी. देवेगौडा पंतप्रधान झाले. परंतु 1999 मध्ये पटेल यांनी विधानसभा बरखास्त केली. बंडखोरांनी त्यांच्याविरोधात उभारलेला झेेंडा, हे त्याचे कारण होते. 1990 मध्ये वीरेंद्र पाटील यांना हटवल्यानंतर 17 ऑक्टोबरला एस. बंगारप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु 1992 मध्ये त्यांना पद सोडावे लागले. पक्षश्रेष्ठींनी तसा आदेश दिला होता.