Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Belgaon › एम. बी. पाटलांचा रुसवा अद्याप कायम

एम. बी. पाटलांचा रुसवा अद्याप कायम

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने माजी जलसंपदामंत्री एम. बी. पाटील व असंतुष्टांनी दिर्ल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा केली; पण ती निष्फळ ठरली. एम. बी. पाटील यांचा रुसवा अद्यापही कायम असल्याचे दिसून आले. 

दिल्लीहून रविवारी येथे परतल्यानंतर एम. बी. पाटील म्हणाले की, आम्ही आमच्या भावना राहुल गांधी यांना सांगितल्या आहेत. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून, पक्षामध्ये कसलीच समस्या नाही. असंतुष्ट आमदारांबरोबर चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल. काँग्रेस पक्ष सोडण्याचा माझा मुळीच विचार नाही.

राहुल गांधी यांच्याबरोबर झालेली चर्चा असमाधानकारक असली तरी काँग्रेस आणि निजद युतीच्या मंत्रिमंडळ रचनेबाबत त्यांना अवगत केले आहे.  पक्षामध्ये कसलीही बेदिली नसून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सक्रिय राहणार आहे. पण, ‘मी दुय्यम दर्जाचा नागरिक नाही’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, बागलकोट येथे आलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, 14 जून रोजी बंगळूरमध्ये युतीच्या समन्वय समितीची बैठक बोलाविली आहे. पक्षातील मतभेद लवकरच दूर होतील. उर्वरित 6 मंत्रिपदे भरण्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय होईल, अशी आशा उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जी. परमेश्‍वर यांनी व्यक्‍त केली.