Thu, Apr 25, 2019 12:26होमपेज › Belgaon › शिवरायांचा खरा मावळा सीमाभागात

शिवरायांचा खरा मावळा सीमाभागात

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:30PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहे. शिवाजी महाराजांचा खरा मावळा सीमाभागातच आहे. ही बलिदानाची भूमी आहे. यामुळेच या मातीचा रंगही लाल असल्याचेे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यानी केले. 

कंग्राळी (बु.) येथे रविवारी सायंकाळी तालुका म. ए. समितीतर्फे आयोजित युवा मेळाव्यात माने बोलत होते. अध्यक्षस्थानी एपीएमसी सदस्य   तानाजी पाटील होते. 

माने म्हणाले, सीमाभागातील मराठी माणसाची गळचेपी केली जात आहे. अनेक वर्षापासून सीमाबांधव महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहे. ही लढाई आता न्यायालयात असली तरी रस्त्यावरची लढाई थांबवून चालणार नाही. काही जणांकडून लढ्याबाबत गैरसमज निर्माण केला जात आहे. युवा पिढीला लढ्यापासून दूऱ ठेवण्यासाठी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. युवकांनी विरोधकांचा डाव वेळीच ओळखावा. कोणत्याही परिस्थितीत लढ्याची धार कमी होता कामा नका.

छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी परकियांसी लढाई केली. कर्नाटक सरकारकडून मराठी माणसाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी संघर्ष जिवंत ठेवला पाहिजे. म. ए. समितीने धगधगत ठेवलेल्या लढ्याच्या पाठीशी युवाशक्‍ती उभी रहिली पाहिजे.  आपली संस्कृती भाषा अस्मितेसाठी लढा देणार्‍या  म. ए. समितीच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहून येत्या निवडणुकीत मराठी बाणा दाखवून दिला पाहिजे, असे आवाहन केले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले,  बेळगाव ही  लढवय्यांची भूमी आहे. संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ या भूमीतुनच सुरू झाली आहे. तत्कालिन राजकर्त्यांनी जाणूनबुजून महाराष्ट्राचा हा भाग कर्नाटकात डांबला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचे तुकडे केले आहेत. कर्नाटक सरकारने वेगवेगळ्या माध्यामातून मराठी माणसांवर अन्याय करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. हा भाग ब्रिटीश राजवटीखाली वावरत असल्याचे चित्र दिसते. कन्नड सक्‍ती 

करून मराठी माणसाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. अन्याया विरूध्द लढण्यासाठी एकी कायम ठेवली पाहिजे.  विधानसभा निवडणुकीत मराठी माणूस सत्तेत आला पाहिजे. आणि कर्नाटकाच्या विधानसभेत मराठीचा आवाज घुमला पाहिजे. यासाठी म. ए. समितीच्या पाठीशी राहिले पाहिजे .यावेळी प्रा. डी. डी. बेळगावकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील यांची भाषणे झाली.

व्यासपीठावर म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, ता. पं. सदस्या लक्ष्मी मेत्री उपस्थित होते. प्रास्ताविक शंकर कोनेरी यांनी केले. सूत्रसंचालन रवि पाटील यांनी केले. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.