Wed, Jul 24, 2019 06:23होमपेज › Belgaon › काँग्रेसला साथ, विकासाची पहाट

काँग्रेसला साथ, विकासाची पहाट

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:18PMखानापूर : वार्ताहर

तालुक्यातील अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे तालुक्याचा विकास ठप्प झाला. जाती-पातीचे राजकारण करुन विकासाचा मुद्दा सोईस्करपणे बाजूला ठेवण्याचा प्रकार वर्षानुवर्षे येथे घडला आहे. आता डॉ.अंजली निंबाळकरांच्या रुपाने तालुक्यात  नवा उमेदवार आला असून, काँग्रेसला साथ देऊन विकासाची नवी पहाट उगवण्यास हातभार लावा, असे मत माजी पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

इटगी, पारीश्‍वाड, मंग्यानकोप, हुलीकोत्तल आदी भागात डॉ.निंबाळकरांचा प्रचार दौरा झाला. त्याप्रसंगी ते इटगी येथे बोलत होते.तालुक्याला भेडसावणार्‍या समस्या मार्गी लावणे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मतयाचना करताना देण्यात येणारी आश्‍वासने पूर्ण करण्याची नैतिकता असली पाहिजे. काँग्रेस सरकारने आश्‍वासनपूर्ती केल्याने जनता पक्षाच्या पाठीशी आहे. डॉ.निंबाळकरांना साथ देवून तालुक्याच्या विकासाला गती द्या, असे आवाहन जारकीहोळी यांनी केले.

स्वाभिमानी खानापुरकरांनी दाखविलेल्या विश्‍वासानेच आजपर्यंतचे सर्व प्रयत्न यशस्वी झाले. महिलांची साथ महत्वाची होती. तालुक्याच्या चारही जि.पं. क्षेत्रामध्ये विकास कामे पोहचविताना स्थानिकांनी हातभार लावला. यापुढेही तालुक्याला सुजलाम करण्यासाठी झटत राहणार आहे. त्यासाठी तालुकावासीयांनी आपले बहुमोल मत देवून साथ द्यावी, असे आवाहन डॉ.निंबाळकर यांनी केले.

यावेळी केपीसीसीचे मुख्य सचिव पी.व्ही मोहन, गोपाळ नाईक, अशोक अंगडी, अभिषेक होसमणी, देमान्ना बसरीकट्टी , शांताराम पाटील, इरशाद मुल्ला आदींसह काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी घरोघरी जावून मतयाचना केली. काँग्रेस सर्वसमावेशक पक्ष असून विकासकामांत कधीही भेदभाव केला नाही. हेच काँग्रेसचे शक्तीस्थान असल्याचेही कार्यकर्त्यांनी मतदारांना सांगितले.