Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Belgaon › आघाडी सरकारचे आयुष्य आगामी ‘लोकसभे’पर्यंतच

आघाडी सरकारचे आयुष्य आगामी ‘लोकसभे’पर्यंतच

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:46AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सध्या धर्मस्थळमधील उजिरे येथे निसर्गोपचार घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी निकटवर्तीयांशी बैठक घेऊन केलेल्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस आणि निजदच्या आघाडी सरकारचे आयुष्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या विधानामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून आपापसांतील भांडणामुळेच सरकार कोसळणार असल्याचे भाकीत प्रदेश भाजप करत आहे. एस. टी. सोमशेखर, भैरती सुरेश, एन. मुनीरत्न, रहिमखान तसेच कागिनेले गुरूपीठाचे निरंजनानंदपुरी स्वामी यांच्यासह काही आमदारांनी सिद्धरामय्यांची उजिरे येथे भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात गुप्‍त चर्चा झाली. या चर्चेवेळी सिद्धरामय्यांनी आघाडी सरकारच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्‍त केली. याआधीच्या काँग्रेस सरकारवेळी आपण अर्थसंकल्प मांडला होता. त्यात आता फेरबदल करून पुन्हा एकदा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी होत आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण वाट पाहून काय तो निर्णय घेऊया, असे त्यांनी निकटवर्तीयांना सांगितले. शिवाय आघाडी  सरकार अल्पकाळाचे असल्याचेही ते म्हणाले.

भाजपची बैठक

प्रदेश भाजपने मंगळवारी 26 रोजी तातडीची बैठक घेऊन या घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. 2 जुलैपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. 5 रोजी मुख्यमंत्री कुमारस्वामी अर्थसंकल्प मांडणार आहेत. यावेळी विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याबाबत चर्चा करण्यात आली. आघाडी सरकारमधील काँग्रेसकडून कुमारस्वामींना पायउतार करण्याची तयारी केली जात आहे. सरकारसमोर अडचणी निर्माण करण्याची गरज नाही. त्यांच्या चुकाच आता भोवणार असल्याचे मत बैठकीत व्यक्‍त करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय अर्थसंकल्प सादर करण्याचे सांगून तत्कालिन मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केला होता. अनेक योजनांचे आश्‍वासन दिले होते. कुमारस्वामींनी काँग्रेस सरकारमधील घडामोडींचा अभ्यास करून नवा अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अर्थसंकल्पामुळे काँग्रेस सरकारमधील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची भीती आहे. यामुळेच सिद्धरामय्या अर्थसंकल्पाला विरोध करत असल्याचा आरोप निजद आमदारांतून होत आहे. 

सिद्धरामय्यांसह काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यातील विविध योजना जारी करण्याची हमी देऊन जादा निधीची तरतूद केली होती.  यामध्ये गैरव्यवहार झाला असून तो निधी निवडणुकीसाठी वापरल्याचा संशय आहे. यामुळेच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ‘कमिशनसाठी अर्थसंकल्प सादर करणार नसून कमिशन कुणी घेतले ते उघड करण्यासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहे.’ असे विधान काही दिवसांपूर्वी केले होते.