Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Belgaon › सामान्यांसाठी सहकार आवश्यक

सामान्यांसाठी सहकार आवश्यक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटकात सहकार चळवळ फोफावली आहे. या चळवळीतून सामान्यांना आधार देण्याचे काम झाले पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकाला प्रोत्साहित करण्याचे काम सहकारातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी केले.

मध्यवर्ती म. ए. समितीने बेळगाव येथे शनिवारी आयोजित केलेल्या सभेला संबोधित करण्यासाठी शरद पवार आले होते. दरम्यान, त्यांनी शहरातील विविध संस्थांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. शहापूर येथील संत तुकाराम को-ऑप. बँकेच्यावतीने खा. पवार यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रकाश मरगाळे होते.

पवार म्हणाले, देशात लहान बँकांनी, पतसंस्थांनी समाजातील लहान घटकांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे सहकार सामान्य घटकाला उभे करण्यात यशस्वी झाला. संस्था योग्यरितीने चालविण्यासाठी कर्जदार व ठेवीदार यांचे सहकार्य आवश्यक असते. बँकांनी अधिक नफा कमावण्याऐवजी समाजाच्या उपयोगी पडण्याचे धोरण स्वीकारणे अत्यावश्यक आहे.

कर्ज परतफेड करणार्‍यावर बँकांचे अस्तित्व अवलंबून असते. याची जाणीव सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी ठेवावी. सहकारमंत्री असताना बेळगाव परिसरातील सहकारी संस्थावर माझी बारीक नजर होती. या बँका अतिशय चांगल्या पद्धतीने चालल्या असून त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार अधिक प्रमाणात करावा.

चेअरमन प्रकाश मरगाळे म्हणाले, पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर संस्थेचे वाटचाल सुरू आहे. एकेकाळी डबघाईला आलेली संस्था अतिशय परिश्रमाने उभी केली आहे. बँकेने लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी मदत केली आहे. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, कोल्हापूरचे खा. धनंजय महाडिक, आ. संध्यादेवी कुपेकर, आ. अरविंद पाटील, उपमहापौर मधुश्री पुजारी,  जि. पं. सदस्या सरस्वती पाटील आदी उपस्थित होते.

संस्थांच्यावतीने नागरी सत्कार

शहरातील विविध संस्थांच्यावतीने शरद पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. खा. डॉ. प्रभाकर कोरे, अविनाश पोतदार, अश्‍विनी बिडीकर, राजश्री हलगेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बेळगाव पायोनियर बँक, मराठा बँक, जिजामाता सहकारी बँक, नवहिंद सोसायटी, आदर्श सोसायटी, के. एल. ई. सोसायटी, मराठा मंदिर ट्रस्ट, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, मराठा मंडळ, साउथ कोकण एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते.


  •