Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Belgaon › कन्नड वापराचा फतवा, मराठीवर घाव

कन्नड वापराचा फतवा, मराठीवर घाव

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 11:20PMबेळगाव : प्रतिनिधी

व्यापारी आस्थापने, सार्वजनिक संस्था यांच्या फलकावर कन्नड भाषेचा वापर करण्याचा फतवा जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला  यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत काढला आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषकांतून संताप व्यक्त होत आहे. सीमाभागात कन्नडचा प्रभाव वाढविण्यासाठी प्रशासनाच्या  माध्यमातून खटाटोप करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात  झालेल्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी कन्नड भाषेचा पुळका घेऊन अनेक सूचना केल्या आहेत. कार्यालयीन वापरात कानडी भाषेचा वापर वाढवावा. अन्य भाषांना व्यवहारात स्थान देण्यात येऊ नये, अशी सूचना केली आहे. सीमाभागात कन्नडचा प्रभाव वाढविण्यासाठी फलकावर कन्नडचा वापर करावा, असाही फतवा काढला आहे. सीमाभागातील 865 गावांमध्ये मराठीचे वर्चस्व आहे. या भागात मराठी जनता बहुसंख्येने राहते. त्यांचे व्यवहार मराठी भाषेतून होतात. यामुळे दुकाने, आस्थापने, सहकारी संस्था यांचे फलक मराठीत आहेत. ग्राहकांना समजणार्‍या भाषेत फलक लावण्याची तरतूद व्यापारी व संस्थाचालक करत असतात. मात्र याकडे कानडोळा करत  केवळ कन्नडचा अट्टहास धरण्यात येत आहे. हा दुराग्रह असल्याची भावना मराठी जनतेतून होत आहे.

वास्तविक बेळगाव, खानापूर, निपाणी भागात मराठी भाषक अधिक संख्येने आहेत. यामुळे व्यवहारासाठी मराठीचा वापर केला जातो. जनहिताच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. याचीच कावीळ प्रशासनाला झाल्याचे दिसून येते. एनकेनप्रकारे मराठी जनतेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.  सीमाप्रश्‍न सध्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. महाराष्ट्राने सीमाभागातील मराठी जनतेची भूमिका ठामपणे मांडली आहे. यामुळे कर्नाटकच्या पायाखालची माती निसटू लागली आहे. यातूनच बेळगाववर हक्‍क सांगण्यासाठी कर्नाटकाकडून नाना उपद्व्याप करण्यात येत आहेत.

सुविधांकडे दुर्लक्ष, अडचणी अधिक

भाषिक अल्पसंख्याकांना कर्नाटक सरकारच्या कायद्यान्वये त्यांच्या भाषेत कागदपत्रे पुरविण्याचा कायदा आहे. यासाठी मराठी भाषक आग्रही आहेत. मराठीतून कागदपत्रे पुरविण्याची मागणी करण्यात येत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मराठीतून कागदपत्रे पुरवण्याऐवजी कानडीकरणाचा वरवंटा फिरवण्याचा उपद्व्याप सुरू आहे.

सोमवारी बैठक

कन्नड प्राधिकार समितीचे अध्यक्ष सोमवार 12 रोजी बेळगाव दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्याकडून अधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार आहे. कन्नड भाषेचा वापर वाढविण्यासाठी त्यांच्याकडून पुन्हा नवे फतवे येण्याची शक्यता आहे. बैठकीला कन्नड संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून मराठीच्या नावाने आग ओकली जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.