Tue, Jul 16, 2019 10:05होमपेज › Belgaon › माजी उपमुख्यमंत्र्यासाठी प्रतिष्ठेची लढत

माजी उपमुख्यमंत्र्यासाठी प्रतिष्ठेची लढत

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 08 2018 8:41PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्याच्या आणि भाजपच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखल्या जाणार्‍या माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांची राजकीय कसोटी शिमोगा मतदारसंघात लागली आहे. काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारामुळे याठिकाणी त्यांना विजय मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.भाजपच्या राजकारणात प्रदेशाध्यक्ष येडियुराप्पा यांचे विरोधक म्हणून ईश्‍वरप्पा यांची ओळख आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते सांभाळत असताना त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याचबरोबर संगोळळी रायण्णा बिग्रेडच्या माध्यमातून भाजप नेतृत्वाला आपले उपद्रवमूल्य दाखवत चांगलाच घाम फोडला होता. अशा 69 वर्षीय ईश्‍वरप्पांना मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत ईश्‍वरप्पा यांना येथून नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. मतांच्या संख्येत ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. याठिकाणी काँग्रेसचे के. बी. प्रसन्नकुमार यांनी ईश्‍वरप्पा यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यानंतर  त्यांची विधानपरिषदेवर निवड करण्यात आली.कजपचे उमेदवार व येडियुराप्पा यांचे पाठीराखेेे रुद्रगौडा यांनी दुसर्‍या क्रमाकांची मते घेतली होती. यावेळी काँग्रेसने आ. प्रसन्नकुमार यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांचे पारडे याठिकाणी जड आहे. तर निजदतर्फे एच. एन. निरंजन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महम्मद युनुस खान अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत.

उमेदवारांच्या विजयात जातीचे गणित महत्त्वाचे आहे. मतदारसंघात 18 हजार मतदार कुरुब, 30 हजार ब्राम्हण, 35 हजार लिंगायत, 15 हजार वक्‍कलिग, 55 हजार मुस्लीम, 40 हजार अनुसूचित जाती-जमातीचे मतदार आहेत.काँग्रेसचे उमेदवार ब्राम्हण समाजाचे आहेत. ईश्‍वरप्पा कुरुब तर निरंजन लिंगायत आहेत. भाजपची व्होटबँक असणार्‍या ब्राम्हण समाजातील उमेदवार काँग्रेसने दिला आहे.  यामुळे भाजपच्या मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ईश्‍वरप्पा हे राज्यातले बडे  नेते म्हणून ओळखले जातात. भाजप सत्तेत आल्यास मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे प्रयत्न राहणार आहेत. यामुळे त्यांना भाजपमधूनच घेरण्याचा प्रयत्न सुरू आहेत. परिणामी ईश्‍वराप्पा यांना निवडणुकीत घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे ही निवडणुकीत ईश्‍वरप्पांसाठी प्रतिष्ठेची आणि राजकीय भवितव्य ठरविणार आहे.ईश्‍वरप्पा हा भाजपचा बहुजन चेहरा आहे. यामुळे त्यांचा विजय पक्षाच्यादृष्टीने महत्त्वाचा असला तरी त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी त्यांना अडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिमोगा मतदारसंघात मुसलमान समाजाची मते अधिक संख्येने आहेत. त्याखालोखाल लिंगायत समाज आहे. भाजप मुस्लिमेत्तर समाजाची मते किती घेतो, यावर विजय अवलंबून राहणार आहे.