Sat, Jul 20, 2019 12:54होमपेज › Belgaon › उघड्यावरील अन्नपदार्थ; आजारांना आमंत्रण

उघड्यावरील अन्नपदार्थ; आजारांना आमंत्रण

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 7:58PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरात खाद्यपदार्थांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी उघड्यावरील अन्नपदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. याकडे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरु असल्याने शहरात रोगराईही वाढली आहे. उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्याने त्यात अजून भर पडत आहे. शहरातील विविध भागात गेल्या काही वर्षांपासून हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थांचे व्यवसाय वाढले आहेत. हॉटेल्स, वडापाव सेंटर, चिनी खाद्यपदार्थांचे गाडे यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेक ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जातेे. हा एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच आहे. असे असले तरी मनपाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.

उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने विविध आजारांची लागण होते. काही वर्षापासून लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. शहरात कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, सरदार्स हायस्कूल मैदान,  कोल्हापूर सर्कल, समादेवी गल्ली, पाटील गल्ली, मारुती गल्ली, टिळकवाडी, अंबा भुवन, शहापूर, गुडशेडरोड,  शास्त्रीनगर, शिवाजी उद्यान परिसर, खासबाग, वडगाव, आरपीडी रोडवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. विविध स्टॉलवर उघड्यावरच अन्नपदार्थ आहेत. खाद्यपदार्थांचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करताना काळजी घेेणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उघड्या अन्नपदार्थांवर माशा बसतात. हे पदर्थ खाल्ल्यावर पोटाचे विकार होण्याची भीती असते. त्याचबरोबर अनेक जण विविध रोगांना बळी पडत असतात. या खाण्यांमुळे साथीच्या रोगाचा फैलाव होत असतो. 

असे खाणे शक्यतो टाळा

शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्टॉल्सवर भजी, वडापाव, इडली, समोसा, कचोरी, गोबी मंचुरी, दहीवडा, उदीनवडा, फ्राईड राईस, नुडल्स आदी पदार्थ उघड्यावर ठेवलेले असतात. हे उघड्यावरील पदार्थ शक्यतो खाणे टाळा.